
कर्जत (रायगड) – कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहाणार्या ५ वर्षांच्या २ शालेय मुलींवर बसमधील स्वच्छता कर्मचार्याने लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी आरोपी करण पाटील (वय २४ वर्षे) याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तो मुलींना चालकाच्या मागच्या आसनावर येऊन बसायला सांगायचा. त्यांना मांडीवर बसवून त्यांच्या शरिराच्या खासगी भागांना स्पर्श करायचा. मुली त्या आसनावर बसल्या नाहीत, तर त्यांना मारहाण करायचा. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार चालू होता. मुलींनी याविषयी पालकांना सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
संतप्त पालक कर्जत पोलीस ठाण्यात गेले; पण आरोपीला वाचवण्यासाठी आमच्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप एका मुलीच्या आईने केला आहे. पालकांनी शाळेच्या बसच्या मालकाच्याही चौकशीसह संबंधित आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणीही केली आहे.
संपादकीय भूमिका :समाजातील वाढती वासनांधता म्हणजे नीतीमत्तेचा र्हास झाल्याचाच परिणाम ! |