धर्मकार्य करणार्‍या, तसेच गरीब रुग्णांवर विनाशुल्क उपचार करणार्‍या रत्नागिरी येथील नेत्ररोगतज्ञ डॉ. (सौ.) राधाराणी पाटील !

डॉ. (सौ.) राधाराणी पाटील

१. श्री. संजय मुळ्ये यांना एका डोळ्याने दिसायचे बंद होणे आणि नेत्ररोगतज्ञांनी डोळ्यात रक्तस्राव झाल्याचे निदान करणे 

‘माझे पती श्री. संजय मुळ्ये यांना वर्ष २००७ मध्ये एक दिवस एका डोळ्याने दिसायचे बंद झाले. दुसर्‍या दिवशी स्थानिक नेत्ररोग तज्ञांकडे डोळे तपासणीसाठी गेलो. तेव्हा त्यांनी ‘यजमानांच्या त्या डोळ्यात रक्तस्राव झाला आहे’, असे सांगितले.

सौ. शुभांगी मुळ्ये

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘श्री. मुळ्ये यांच्यावर रत्नागिरीतच उपचार होतील’, असे सांगणे 

त्या कालावधीत मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेले असतांना सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना ही घटना सांगितली आणि ‘‘पुढील उपचारांसाठी आम्ही पुणे किंवा मुंबई येथे जाऊ का ?’’ असे विचारले. त्या वेळी गुरुदेवांनी सांगितले,‘‘मुळ्येकाकांच्या डोळ्यांचे सर्व वैद्यकीय उपचार रत्नागिरीतच होतील ! कुठे बाहेर जायला नको.’’

३. नेत्ररोगतज्ञ डॉ. (सौ.) राधाराणी पाटील यांच्या उपचारानंतर ७ व्या दिवशी श्री. मुळ्ये यांना दिसायला लागणे 

त्या वेळी केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळे रत्नागिरीतील अन्य एक नेत्ररोगतज्ञ डॉ. (सौ.) राधाराणी पाटील यांच्याकडे आम्ही गेलो. त्यांच्या उपचारांनंतर सातव्या दिवशीच मुळ्येकाकांना त्या डोळ्याने दिसू लागले. तेव्हापासून आजपर्यंत डॉ. (सौ.) पाटील आम्हाला देवासारख्याच वाटतात. आता आम्ही आमचे डोळे तपासायला नेहमी त्यांच्याकडेच जातो.

४. नेत्ररोगतज्ञ डॉ. पाटील यांना धर्मकार्य करणार्‍यांविषयी आदर असल्यामुळे त्यांनी विनाशुल्क उपचार करणे 

अध्यात्माच्या कार्याविषयी डॉ. (सौ.) पाटील यांना पुष्कळ आदर आहे. ‘आम्ही धर्मकार्य करतो’, हे कळल्याने त्या आमच्याकडून शुल्क घेत नाहीत. त्यांच्या स्वागतकक्षातील कुणी चुकून शुल्क घेऊन पावती दिली, तर तपासणीच्या वेळी कागदपत्रांवरून ते त्यांच्या लक्षात येते. त्या वेळी त्या पावती परत करायला सांगून शुल्क परत देतात. सनातनच्या अन्य साधकाला त्यांच्याकडे तपासणीसाठी नेले, तरी त्या त्याचे शुल्क घेत नाहीत.

५. कोणताही मोठेपणा न बाळगता समाजातील गरीब व्यक्तींवरही विनाशुल्क उपचार करणे 

एखाद्या गरीब व्यक्तीने त्यांना स्वतःची आर्थिक अडचण सांगितली की, त्या अशा व्यक्तीचे शुल्क, तसेच औषधांचा व्यय न घेता तिची डोळ्यांची शस्त्रक्रिया विनाशुल्क करतात. याविषयी त्यांना ‘आपण जगावेगळे काही करतो’, असा मोठेपणाही वाटत नाही.

आम्ही सर्व मुळ्ये परिवार नेत्ररोगतज्ञ (सौ.) राधाराणी पाटील यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.’

– सौ. शुभांगी संजय मुळ्ये, रत्नागिरी (३.४.२०२५)


प्रसिद्धीपराङ्मुख आणि साधकांना निरपेक्षतेने साहाय्य करणार्‍या डॉ. (सौ.) राधाराणी पाटील !

डॉ. (सौ.) राधाराणी पाटील

१. रुग्णालयात गेल्यावर तेथे पुष्कळ रुग्ण असल्याने डोळ्यातील मोतीबिंदूचे शस्त्रकर्म करण्याचे टाळणे; मात्र गुरुदेवांच्या कृपेने बसथांब्यावर अकस्मात् भेटलेल्या एका नेत्ररोगतज्ञांमुळे शस्त्रकर्म करण्याचे ठरवणे 

‘मी डोळ्यातील मोतीबिंदूची तपासणी करण्यासाठी रत्नागिरी येथे नेत्ररागतज्ञ आधुनिक वैद्य राधाराणी पाटील यांच्या रुग्णालयात गेलो होतो. तेव्हा मला दिसले, ‘तेथे ४० रुग्ण तपासणी करण्याच्या प्रतीक्षेत आहेत.’ त्या वेळी ‘तेथे मला ४ घंटे थांबावे लागेल’, असे समजल्यावर मी तेथून निघालो आणि आमच्या गावी जाणार्‍या बसथांब्यावर थांबलो. तेव्हा तेथे एक व्यक्ती आली आणि तिने माझी विचारपूस केली. मी त्या व्यक्तीला सांगितले, ‘‘माझ्या डोळ्यांत मोतीबिंदू झाला आहे. मी तपासणीसाठी रुग्णालयात गेलो होतो. तेथे पुष्कळ गर्दी होती; म्हणून मी परत आलो. आता मला शस्त्रकर्म करायचे नाही.’’ त्यावर ती व्यक्ती मला म्हणाली, ‘‘असे करू नका. तुम्ही लवकरात लवकर शस्त्रकर्म करून घ्या. मीही नेत्ररोगतज्ञ आहे. तुम्ही कणकवली येथील माझ्या रुग्णालयात शस्त्रकर्मासाठी येऊ शकता.’’ अशा प्रकारे माझे मोतीबिंदूचे शस्त्रकर्म करण्याची सिद्धता मला अकस्मात् भेटलेल्या एका नेत्ररोगतज्ञांमुळे झाली. ‘गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) साधकांना कसे साहाय्य रतात !’, हे माझ्या लक्षात आले.

श्री. भार्गव वझे

२. सर्वत्र सात्त्विक वातावरण असलेले आधुनिक वैद्या राधाराणी पाटील यांचे नेत्ररुग्णालय ! 

२२.१०.२०२४ या दिवशी आम्ही (मी आणि माझा मुलगा श्री. गिरिधर) रत्नागिरी येथील नेत्ररोगतज्ञ आधुनिक वैद्य राधाराणी पाटील यांच्या रुग्णालयात गेलो. तेथे स्वागतकक्षाच्या पुढच्या सभागृहात गणपतीची मूर्ती आहे. तेथे दिवा सतत तेवत असतो. आधुनिक वैद्य राधाराणी पाटील रुग्णांना ज्या ठिकाणी तपासतात, त्या ठिकाणी तिरुपती बालाजी, राधाकृष्ण, तसेच कोतवडे येथील श्री महालक्ष्मीदेवी यांची चित्रे आहेत. तेथे हळू आवाजात ‘श्री व्यंकटेशाय नमः ।’ हा नामजप लावलेला असतो. त्यांच्या रुग्णालयात पुष्कळ सात्त्विकता जाणवते. असे आध्यात्मिक स्तरावरील आधुनिक वैद्य आणि नेत्ररुग्णालय मी प्रथमच पाहिले.

३. आधुनिक वैद्या राधाराणी पाटील यांनी साधकांची आपुलकीने विचारपूस करणे 

नेत्ररोगतज्ञ आधुनिक वैद्या राधाराणी पाटील यांनी आमची विचारपूस केली. तेव्हा गिरिधरने त्यांना सांगितले, ‘‘बाबा घरी राहून पौरोहित्य करतात आणि सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात. मी सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतो.’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘काल इस्कॉन संप्रदायातील एक साधक आले होते. आज तुम्ही आलात. साधनेचे मार्ग वेगवेगळे असले, तरी सर्वांना एकाच ठिकाणी (ईश्वराकडे) जायचे आहे. आपण तुमचे शस्त्रकर्म विनामूल्य करूया.’’ तेव्हा माझी भावजागृती होऊन गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त झाली. त्यानंतर मी त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही शस्त्रकर्म विनामूल्य करत असल्याने तुमच्या नावे शस्त्रकर्माचे पैसे मी सनातन संस्था करत असलेल्या धर्मकार्यासाठी अर्पण करू का ? किंवा ‘राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करणार्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये तुमच्या नावे विज्ञापन देऊ का ?’’ तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘तुम्ही अर्पण करा; पण माझे कुठेही नाव नको.’’ त्या वेळी ‘त्या किती प्रसिद्धीपराङ्मुख आहेत !’, या विचाराने माझी भावजागृती झाली.’

४. कौटुंबिक भावना असलेले रुग्णालयातील कर्मचारी ! 

२४.१०.२०२४ या दिवशी आधुनिक वैद्य राधाराणी पाटील यांनी माझ्या डोळ्यातील मोतीबिंदूचे शस्त्रकर्म विनामूल्य केले. नंतरही तेथील परिचारिकांनी माझ्या डोळ्यांमध्ये आवश्यकतेनुसार विविध औषधे (ड्रॉप) घालणे आणि आधुनिक वैद्यांनी डाेळ्याची तपासणी करणे इत्यादी सर्वतोपरी आम्ही त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती असल्याप्रमाणे केले. त्या रुग्णालयातील सर्व सेवक रुग्णांना व्यवस्थित माहिती देतात. तेथे मला २ वेळा गुरूंचे स्वरूप आठवून माझी भावजागृती झाली.’

– श्री. भार्गव गंगाधर वझे (जुलै २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६९ वर्षे), कोतवडे, जिल्हा रत्नागिरी. (४.११.२०२४)


आधुनिक वैद्य राधाराणी पाटील यांच्या साधनेमुळे त्यांच्या रुग्णालयात आनंददायी वातावरण अनुभवता येणे 

श्री. गिरिधर वझे

‘मी माझे वडील (श्री. भार्गव गंगाधर वझे) यांच्या मोतीबिंदूचे शस्त्रकर्म करण्यापूर्वी आणि त्यानंतर आधुनिक वैद्य राधाराणी पाटील यांच्या नेत्ररुग्णालयात गेलो होतो. आजपर्यंत मला भेटलेल्या अनेक परिचित व्यक्ती आणि सनातनचे साधक यांनी आधुनिक वैद्य राधाराणी पाटील यांच्याविषयी एकही नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त न करता त्यांचे कौतुकच केले. ‘आधुनिक वैद्य राधाराणी पाटील प्रथितयश नेत्ररोगतज्ञ असूनही त्या साधना करत असल्याने त्यांच्यासह त्यांच्या रुग्णालयातील अन्य आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांमुळे तेथील वातावरण आनंददायी आहे’, असे मला वाटते.’

संतांच्या माध्यमातून गुरूंची कृपा !

पू.परांजपेआजोबा यांना तीर्थरूप बाबांच्या मोतीबिंदू शस्त्रकर्मासाठी मी घरी जात असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी स्मितहास्य करून आनंदाने आशीर्वादस्वरूप उद्गारले, ‘शस्त्रकर्म चांगल्या प्रकारे होऊदे.’ या आशीर्वादाची प्रचीती ती. बाबांच्या दोन्ही डोळ्यांच्या शस्त्रकर्माविषयी आली. पू. आजोबांसह गुरुचरणी कृतज्ञतापूर्वक शिरसाष्टांग नमस्कार.

– श्री. गिरिधर भार्गव वझे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.२.२०२५)