कोरेगाव-भीमा (जिल्हा पुणे) – श्री क्षेत्र तुळापूर येथे प्राचीन कालीन नागरमल खंडोबा मंदिर आहे. या देवस्थानची मांजरी बुद्रुक येथे २४ एकर आणि तुळापूर येथे २५ एकर भूमी आहे. ही भूमी मंदिराच्या दिवाबत्तीसाठी धनगर समाजाच्या पुजार्यांना उदरनिर्वाहाचे साधन म्हणून देण्यात आली होती. देवस्थान ट्रस्टने (विश्वस्तांनी) धर्मादाय आयुक्तांची अनुमती न घेता मांजरी बुद्रुक येथील भूमी विकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मंदिराच्या पुजार्यांनी केला आहे. या प्रकरणी पुजार्यांनी मंदिराच्या पायथ्याला धरणे आंदोलन चालू केले आहे.
१. आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्यवहार करण्यासाठी विश्वस्तांनी काही रक्कम स्वीकारली आहे.
२. संबंधित ट्रस्ट (विश्वस्त मंडळ) तातडीने विसर्जित करून नविन अध्यक्षांची निवड व्हावी आणि भूमी विक्री होऊ नये, अशा मागण्यांचे निवेदन लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, धर्मादाय आयुक्त कार्यालय पुणे, मुंबई प्रधान सचिव, विधी आणि न्याय विभाग मुंबई, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात आले आहे.
३. खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर घुले यांनी सांगितले की, देवस्थानच्या भूमीसाठी आपण न्यायालयात ३० वर्षे लढत आहोत. आमच्या पूर्वजांनी ही भूमी देवस्थानला दान दिली आहे. मांजरी येथील भूमीचा ताबा कुळांकडे आणि तुळापूर येथील भूमीचा ताबा पुजार्यांकडे आहे. आमचा भूमी विकण्याचा हेतू नाही.