वॉशिंग्टन – अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पेंटागॉनने २ मिनिटांत अणूबॉम्ब वापरण्याची सिद्धता ठेवण्याचा नवा आदेश दिला आहे. पेंटागॉनच्या आदेशानुसार, संदेश मिळाल्यानंतर दोन मिनिटांच्या आत किंवा त्यापेक्षा अल्प कालावधीत अण्वस्त्रांचा वापर करणे आवश्यक आहे. अमेरिका वर्ष २०२६ पर्यंत ‘बी ६१-१३’ हा धोकादायक अणूबॉम्ब बनवण्यात व्यस्त आहे. एका अहवालानुसार, हा अणूबॉम्ब हिरोशिमावर टाकलेल्या अणूबॉम्बपेक्षा २४ पट अधिक शक्तीशाली असून त्याची क्षमता ३६० किलोटन इतकी आहे.
अमेरिकेच्या ‘जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ’च्या अध्यक्षांनी एक आदेश प्रसारित केला आहे. ‘इमर्जन्सी ॲक्शन मेसेज’ या शीर्षकाखाली प्रसारित केलेल्या या आदेशात असे म्हटले आहे की, दोन मिनिटांत किंवा त्यापेक्षा अल्प वेळेत अणूबॉम्ब कमांड, नियंत्रण आणि संप्रेषण कारवाई चालू झाली पाहिजे. ‘सँडिया नॅशनल लॅबोरेटरी’ ‘बी ६१-१३’ बॉम्ब विकसित करत आहे. ते म्हणतात की, आजच्या काळाचा विचार करून हा बॉम्ब बनवला जात आहे. त्यांच्या मते, तो शत्रूंना घाबरवेल आणि मित्र राष्ट्रांना धीर देईल.