शिरगाव येथील श्री लईराई मंदिरापासून १५० मीटर, तर शेवटच्या घरापासून ५० मीटर ‘बफर झोन’
(‘बफर झोन’ म्हणजे खनिज उत्खनन प्रतिबंध क्षेत्र)
पणजी, १६ एप्रिल (वार्ता.) – शिरगाव येथील खाण क्षेत्राचा लिलाव झाला आहे. हा लिलाव मिळवलेल्या आस्थापनासाठी श्री लईराई मंदिराच्या सीमेपासून १५० मीटर आणि गावातील शेवटच्या घरापासून ५० मीटर अंतरापर्यंत खाण खात्याने ‘बफर झोन’ घालून दिला आहे. खाण खात्याने असे प्रतिज्ञापत्र लिलाव जिंकलेल्या संबंधित आस्थापनाकडून घेतले आहे. यामुळे संबंधित आस्थापनाला प्रतिबंधित क्षेत्रात कधीही खनिज उत्खनन करता येणार नाही, अशी माहिती खाण खात्याच्या सूत्रांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे.
सरकारने राज्यात बंद असलेल्या खाणी चालू करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ९ खाण क्षेत्रांचा लिलाव केला. हा लिलाव करतांना संबंधित क्षेत्र असलेल्या भागातील नागरिकांची घरे, मंदिरे, वारसास्थळे आदींची पहाणी करण्यात आली नव्हती. शिरगाव येथील खाण क्षेत्र परिसरात श्री लईराई मंदिर आणि नागरिकांची घरे आहेत. यामुळे या लिलावानंतर या भागातील नागरिकांनी खाण क्षेत्रामधून श्री लईराई मंदिर वगळण्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली होती आणि मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दर्शवला होता. यानुसार खाण खात्याने शिरगाव खाण क्षेत्रासाठी ‘बफर झोन’ निश्चित केला आहे आणि याचे पालन करण्यासंबंधीची हमी संबंधित आस्थापनाकडून प्रतिज्ञापत्राद्वारे घेतली आहे. उर्वरित ८ खाण क्षेत्रांसंबंधीही अशाच प्रकारचा निर्णय घेणार असल्याचे खाण खात्याने सांगितले.
आणखी काही खाण क्षेत्रांचा लवकरच होणार लिलाव
खाण खाते पुढील काही मासांत आणखी काही खाण क्षेत्रांचा लिलाव करणार आहे. यासाठी खाण खात्याने संबंधित क्षेत्रांच्या परिसराचे सर्वेक्षण करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. येथील प्रश्न आणि समस्या यांवर तोडगा काढूनच खाण क्षेत्रांचा लिलाव होणार असल्याचे खाण खात्याने सांगितले आहे.