शरद पवारांच्या बाजूने असलेल्या संघटना हा विषय बाहेर काढत असल्याची टीका !

पुणे – रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीची सुरक्षा वाढवली पाहिजे. याठिकाणी आणखी २० पोलीस सुरक्षेसाठी तैनात केले पाहिजेत. संभाजी ब्रिगेड टोकाची भूमिका मांडते. २०१२ मध्येही असाच काहीसा प्रयत्न झाला होता. वाघ्या कुत्र्याच्या समाधीविषयी राज्य सरकारने ठाम भूमिका घेतली पाहिजे, असे वक्तव्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. ते पुणे येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
या वेळी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली. उदयनराजे यांच्याविषयी नितांत आदर आहे, हे खुसपट ब्रिगेडने काढले आहे. शरद पवारांच्या बाजूने असलेल्या या संघटना विषय बाहेर काढतात. सगळे इतिहासकार शरद पवारांच्या बाजूचे आहेत. शरद पवार यांनी फावल्या वेळेत नवा इतिहास लिहावा. एकदाच नवीन इतिहास लिहा, म्हणजे पुढच्या पिढ्यांना परत इतिहास लिहण्याची आवश्यकता नाही, अशी खोचक टिपणीही गोपीचंद पडळकर यांनी केली.
पडळकर यांनी म. फुले यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटावरून चालू असलेल्या वादावरही प्रतिक्रिया दिली. ‘जात बघून इतिहास काढायचा. नवीन इतिहासकार जागे झाले आहेत. नवीन इतिहासकार ‘लाँच’ झाले आहेत. हे इतिहासकार २५० रुपयांचे जॅकेट घालून फिरतात’, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.