
पुणे – धरणात १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याने पावसाळ्यापर्यंत शहरात पाणीकपात होणार नाही. त्यामुळे शेती सिंचनासाठीही पुढील २ महिने पाणी देण्यात येणार आहे. सर्वांना पाणी दिल्यानंतरही धरणामध्ये जवळपास १ अब्ज घनफूट (टी.एम्.सी.) पाणी शिल्लक रहाणार आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
पुण्यासाठी खडकवासला प्रकल्पातील वरसगाव, पानशेत, खडकवासला आणि टेमघर या ४ धरणांमधून पाणीपुरवठा होतो. या सर्व धरणांमध्ये सध्या ४०.८३ टक्के पाणी उपलब्ध असल्याने या उन्हाळ्यात पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जाणार नाही. गतवर्षीपेक्षा यावर्षी २ टक्क्यांनी पाणीसाठा अधिक आहे. पुणे शहराला पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी पुढील ३ महिन्यांत प्रत्येकी ५ टी.एम्.सी. पाणी दिले जाईल. या व्यतिरिक्त १ टी.एम्.सी. पाणी साठा शिल्लक राहील. आवश्यकतेनुसार त्या पाण्याचा वापर केला जाईल, असे खडकवासला प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुर्हाडे यांनी सांगितले.