‘संगीतातून साधना व्हावी’, अशी तळमळ असलेल्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा असलेल्या पुणे येथील श्रीमती लीला घोले (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ८३ वर्षे) !

श्रीमती लीला घोले

१. श्रीमती लीला घोले यांचे संगीत क्षेत्रातील योगदान ! 

‘श्रीमती लीला घोले (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ८२ वर्षे) यांनी ‘संगीत अलंकार’ ही पदवी प्राप्त केली आहे. त्या सहकारनगर, पुणे येथील ‘सूर संवर्धन संगीत विद्यालया’च्या प्राचार्या म्हणून १५ वर्षे  कार्यरत होत्या. त्यांनी १५ वर्षे शास्त्रीय गायनाच्या शिकवण्याही घेतल्या आहेत.

श्रीमती घोलेकाकूंनी गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांचे जुन्या सेमी क्लासिकल संगीतावर आधारित चित्रपटातील गाण्यांचे आणि त्या गाण्यात त्यांनी घेतलेल्या हरकती इत्यादींचे स्वरात रूपांतर करण्याचे मोठे कार्य केले. त्यांनी हे कार्य २५ वर्षांपूर्वी लीलया केले होते.

त्या कीर्तनातील निरनिराळ्या पदांना पदांच्या रस-परिपोषानुसार संगीतातील चाली लावण्याची सेवा करतात आणि मी त्या पदांचे ध्वनीमुद्रण करून त्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संग्रही जमा करते. जेणेकरून येणार्‍या पिढीला त्याचा लाभ होईल. श्रीमती घोले यांच्या समवेत ही सेवा करत असतांना मला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

२. संगीतातील काही संज्ञा आणि त्यांचा अर्थ

अ. हरकती : एखादी सुरावट म्हणतांना किंवा वाजवतांना त्यात गमक, मुरकी, गायनाच्या काही लकबी यांचा उपयोग करून गाणे किंवा वाजवणे.

आ. काळी चार पट्टी : हार्माेनियममधील प्रमाणित (स्टँडर्ड) स्वररचनेनुसार काळी चार या पट्टीचे स्थान १७ व्या श्रुतीवर निश्चित केले आहे. त्या स्थानाला ‘काळी चार पट्टी’ असे म्हणतात.

इ. तार सप्तक : संगीतातील तीन सप्तकांपैकी हे तिसरे सप्तक आहे. तार सप्तकातील स्वर गातांना निघणारा नाद हा ‘टाळू’ (तोंडातील) या शरिराच्या स्थानातून निर्माण होतो.

ई. आख्यान : नारदीय कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला जे प्रबोधन करायचे आहे, त्या विषयाला ठासून सांगण्यासाठी उत्तररंगात जी कथा सांगितली जाते, त्याला ‘आख्यान’ म्हणतात.

३. श्रीमती लीला घोले यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये 

३ अ. शारीरिक मर्यादा असूनही सेवारत असणे 

१. घोलेकाकूंनी प्रसारात २५ वर्षे अविरत सेवा केली आहे. त्यांना शारीरिक मर्यादा असूनही त्या अजूनही सेवा करतात.

२. त्यांना फार वेळ बसता येत नाही, तरीही त्या कीर्तन आणि संगीत या सेवेसाठी दीड-दोन घंटे बसून सहजतेने सेवा करतात. मी त्यांना सेवेसाठी भ्रमणभाष केला असता त्यांनी कधीही शारीरिक अडचण सांगितली नाही. त्यांनी कधीही ‘सेवेसाठी जमणार नाही’, असे सांगितले नाही. त्यांना बसवत नसेल, तर त्या पलंगावर आडवे पडून सेवा करण्याचा प्रयत्न करतात.

सौ. श्रेया साने

३ आ. ‘सत्यं शिवं सुन्दरम्’ अशी सेवा करण्याचा प्रयत्न करणे : आख्यानात जी गीते असतात, त्या गीतातील प्रत्येक पद अर्थासहित नीट समजून घेऊन आणि त्याचे उच्चार शुद्ध करून घेऊन त्या पदाला शोभेल अन् त्या पदाच्या स्वभावाला अनुकूल अशा रागाची निवड करून पदांना विचारपूर्वक चाली लावतात. ही सेवा करत असतांना ‘त्या गुरुदेवांच्या चरणी प्रत्येक स्वर अर्पण करत आहेत’, असे मला वाटते. ‘आख्यान ‘सत्यं शिवं सुन्दरम्’ आणि भक्तीपूर्ण व्हायला हवे’, अशी त्यांची तळमळ असते.

३ इ. त्यांच्या मनात सतत ‘कीर्तन आणि संगीत’ यांसाठी काय करू आणि कसे करू’, याचाच विचार असतो.

३ ई.  त्यांचा आवाज वयाच्या ८३ व्या वर्षीसुद्धा काळी चार या पट्टीत सहजतेने तार सप्तकाच्या पंचम पर्यंत जातो. ‘ही त्यांच्यावर गुरुदेवांची असीम कृपाच आहे’, असे जाणवते.

३ उ. शिकण्याची वृत्ती 

१. त्या या वयातही नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक असतात. आख्यानात ‘हिंदी किंवा ब्रज या भाषांतील पदे यांचा समावेश असेल, तर त्याचा अर्थ आणि उच्चार कसा करायचा ?’, हे त्या पूर्ण आत्मसात होईपर्यंत चिकाटीने समजून घेतात आणि नंतर त्या काव्याच्या रसपरिपोषणानुसार योग्य तालात चाल लावतात.

२. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये संगीताविषयी येणार्‍या सदरातील माहिती वाचून त्यात सांगितलेल्या गोष्टी त्या स्वतः करून पहातात, उदा. एकदा शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी ‘गंधार’ स्वर आळवला. ते ऐकून साधक आणि संत यांना अनुभूती आल्या. त्याविषयी काकूंनी वाचल्यावर काकूंनी तसा प्रयोग करून पाहिला.

३ ऊ. त्या संगीत वर्गातील विद्यार्थ्यांकडून नियमित साधनेचे प्रयत्न करून घेतात. 

३ ए. अल्प अहं  : त्या संगीत क्षेत्रात उच्च विद्याविभूषित असूनही त्यांनी प्रत्येक पदाला चाल लावल्यावर ‘ती योग्य आहे का ?’, असे मला विचारतात.

३ ऐ. गुरूंवर निस्सीम श्रद्धा : एकदा घोलेकाकू काही दिवस संगीत आणि कीर्तन या सेवांसाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात येणार होत्या. तेव्हा त्यांना विचारले, ‘‘तुम्ही महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात प्रयोगासाठी कीर्तन करू शकता का ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘अन्य वेळी मला उभे रहायला अडचण येते; पण कीर्तनासाठी मी एक-दीड घंटा सहजतेने उभी राहू शकते; कारण त्या वेळी गुरुदेवच (परात्पर गुरु डॉ. आठवले) मला उभे रहाण्यास बळ देतात आणि आवाजही तेच देतात.’’

गुरुभक्तीचे चालते बोलते उदाहरण, म्हणजे श्रीमती घोलेकाकू आहेत. ‘हे गुरुदेवा, तुम्हीच माझी त्यांच्याशी ओळख आणि जवळीकही करून दिली. मलाही त्यांच्याप्रमाणे चिकाटीने आणि सातत्याने तुमची सेवा करता येऊ दे’, अशी मी तुमच्या पावन चरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.’

– सौ. श्रेया शशांक साने (प्रयाग संगीत समितीतील प्रभाकर परीक्षा उत्तीर्ण), आंबेगाव, पुणे. (२.४.२०२५)