
मुंबई – समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोचला पाहिजे, हा मौलिक विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडला. या विचारांवर आधारित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सव’ राज्यभरात २२ ते २५ एप्रिल या कालावधीत राबवण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून राज्यात ‘आदर्श गाव’ ही संकल्पना राबवणार आहोत, अशी माहिती कौशल्य विकास, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
याविषयी १६ एप्रिल या दिवशी मंत्रालयात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या महोत्सवासाठी शासनाने समिती स्थापन केली असून मंगलप्रभात लोढा या समितीचे अध्यक्ष आहेत.
मंगलप्रभात लोढा म्हणाले, ‘‘पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे कार्य, विचारप्रणाली, एकात्म मानवदर्शन यांविषयीची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पंडितजींच्या विचारांवर आधारित १ लाख पुस्तिकांचे वितरण करण्यात येणार आहे. या महोत्सवात ग्रामीण भागात बचतगट, अंगणवाड्या आणि शाळा यांमध्ये कौशल्य विकासावर भर देण्यात येणार आहे. गावातील स्वच्छताविषयक उपक्रम, घनकचर्याची विल्हेवाट लावण्याची योजना सिद्ध करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकार्यांना दिल्या आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोचवण्यासाठी या महोत्सवात युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येतील.’’