प्रवाशांना चांगली सुविधा न देणार्‍या ढाब्यांची मान्यता रहित करा ! – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

एस्.टी.च्या गाड्या थांबत असलेल्या हॉटेलमध्ये १५ दिवसांत सर्वेक्षण होणार !

प्रताप सरनाईक

मुंबई – लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या कालावधीत एस्.टी. बसगाड्या थांबत असलेल्या हॉटेलमध्ये प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळत नसतील, तर त्यांची मान्यता रहित करा, असे निर्देश परिवहन आणि एस्.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एस्.टी. प्रशासनाला दिले आहेत. यासाठी येत्या १५ दिवसांत एस्.टी.च्या गाड्या थांबणार्‍या सर्व धाब्यांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचेही निर्देश त्यांनी एस.टी.च्या अधिकार्‍यांना दिला आहे.

प्रतिकात्मक चित्र

याविषयी एस्.टी. महामंडळाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे की, लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या कालावधीत एस्.टी.च्या गाड्या विविध हॉटेल किंवा ढाबे येथे थांबतात. तेथे प्रवाशांना चहा, अल्पाहार, जेवण, प्रसाधनगृह व्यवस्था आदी सुविधा दिल्या जातात. अनेक ढाब्यांविषयी प्रवाशांच्या तक्रारी येत आहेत. यामध्ये प्रसाधनगृह अस्वच्छ असणे, अल्पाहाराचे पदार्थ शिळे असणे, हॉटेलचे कर्मचारी आणि मालक यांची वर्तणूक अत्यंत वाईट असणे अशा प्रकारच्या तक्रारींचा समावेश आहे. यांची नोंद घेऊन परिवहन मंत्र्यांनी वरील निर्देश दिले आहेत. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रवाशांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड न करता ढाब्यांवर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश परिवहनमंत्र्यांनी दिले आहेत.

संपादकीय भूमिका

प्रवाशांकडून अवाच्या सवा शुल्क आकारणारे हॉटेल आणि ढाबे यांचीही मान्यता रहित झाली पाहिजे !