Pakistani Shot Dead In Iran : इराणमध्ये ८ पाकिस्तानी नागरिकांची गोळ्या घालून हत्या

तेहरान (इराण) – बलुच क्रांतीकारकांनी आता पाकिस्तानाबाहेरही पाकिस्तानी लोकांना लक्ष्य करणे चालू केले आहे. इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील रक्तपाताने जग हादरले आहे. बलुच क्रांतीकारकांनी एका वाहन दुरुस्ती केंद्रावर आक्रमण करून ८ पाकिस्तानी नागरिकांची गोळ्या घालून हत्या केली. या आक्रमणामुळे पाकिस्तान-इराण संबंधांमध्ये नवीन तणाव निर्माण झाला आहे. (पाकिस्तानने जे पेरले, तेच उगवत आहे ! – संपादक) ‘बलुचिस्तान नॅशनल आर्मी’ नावाच्या बंदी घातलेल्या संघटनेने या हत्याकांडाचे दायित्व स्वीकारले आहे.

१. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या आक्रमणाविषयी तीव्र दु:ख व्यक्त केले आणि त्याला ‘आतंकवाद्यांचे क्रूर कृत्य’ असे म्हटले आहे. या घटनेविषयी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, हे एक अमानवी आणि भ्याड कृत्य आहे. इराणने या प्रकरणाची कसून चौकशी करावी आणि दोषींना शिक्षा द्यावी.

२. सिस्तान-बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी नागरिकांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये सरवण शहरात अशाच प्रकारे ९ पाकिस्तानी नागरिकांची हत्या करण्यात आली होती.