Tamil Nadu Waqf Claims Land In Vellore : वेल्लोर (तमिळनाडू) जिल्ह्यातील एका गावातील १५० घरांच्या भूमीवर वक्फ बोर्डाचा दावा

पीडित स्थानिक रहिवाशी

वेल्लोर (तमिळनाडू) – जिल्ह्यातील विरंचीपूरम् भागातील कट्टू कोलाई गावात गेल्या ४ पिढ्यांपासून रहात असलेल्या १५० कुटुंबांवर अचानक बेघर होण्याची परिस्थिती ओढवली आहे. ते रहात असलेली भूमी वक्फची असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही भूमी नवाब मशीद आणि हजरत सय्यद अली सुलतान शाह दर्गा यांच्याशी संबंधित असल्याचे सांगितले जाते आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रहिवाशांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे कागदपत्रे असून त्यावरून भूमी त्यांच्या मालकीची असल्याचे लक्षात येते.

१. हजरत सय्यद अली सुलतान शाह दर्ग्याशी संबंधित सय्यद सदाम यांनी गावातील रहिवाशांना कर भरण्याची मागणी करणारी नोटीस पाठवली आहे. नोटीसीमध्ये दावा करण्यात आला होता की, ही भूमी वक्फ बोर्डाची मालमत्ता आहे आणि दर्गा तिचे व्यवस्थापन करते.

२. मशिदीचे प्रमुख मुतवल्ली (व्यवस्थापक) म्हणाले की, गावकर्‍यांना आधीपासून ठाऊक आहे की, ही भूमी वक्फची आहे. सरकारी नोंदी दर्शवतात की, ही भूमी वर्ष १९५४ मध्येही वक्फची होती.

हिंदू संघटनांकडून निदर्शने

हिंदू मुन्नानी (हिंदू आघाडीवर) संघटनेने गावकर्‍यांना एकत्र केले. त्यांनी या नोटीसविरुद्ध वेल्लोर जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज केला आहे. जिल्हाधिकारी व्ही.आर्. सुब्बुलक्ष्मी यांनी सांगितले की, त्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. ‘कुणालाही बेघर केले जाणार नाही’, असे आश्वासन त्यांनी दिले.

भाजपचे आमदार सी. सरस्वती यांनी म्हटले की, वक्फ बोर्डाकडे योग्य कागदपत्रे नाहीत. ते मनमानी करत आहेत.

संपादकीय भूमिका

देशात वक्फ कायद्यात सुधारणा करण्यात आल्यानंतरही अशा प्रकारच्या घटना घडणे योग्य नाही. सरकारने अशांवर आताच कारवाई करून कायद्याचा बडगा चालवला पाहिजे !