देहली येथील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी वर्गखोलीची भिंत शेणाने सारवली !

खोली थंड ठेवण्याविषयी करत असलेल्या संशोधनाचा भाग असल्याचे प्राचार्यांचे मत

वर्गाची भिंत शेणाने सारवत असताना

नवी देहली – देहली विद्यापिठाच्या अंतर्गत येणार्‍या राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रत्युषा वत्सला महाविद्यालयाच्या वर्गाची भिंत शेणाने सारवत असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. डॉ. वत्सला यांच्या मते, असे करणे, हा संशोधन प्रकल्पाचा एक भाग आहे. त्यांनी स्वतः हा व्हिडिओ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना पाठवला आहे. व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की, वर्ग थंड ठेवण्यासाठी या स्वदेशी पद्धतींचा अवलंब केला आहे.

१. डॉ. वत्सला यांच्या मते हा प्रकल्प महाविद्यालयाच्या एका प्राध्यापकाच्या देखरेखीखाली चालवला जात आहे. संशोधन सध्या एका विशिष्ट टप्प्यात आहे आणि संपूर्ण माहिती एका आठवड्यानंतर मिळाल्यावर हे संशोधन सर्वांसमोर आणले जाईल.

२. शेणामध्ये उत्कृष्ट ‘इन्सुलेटर’चे (विशिष्ट सामग्री जी उष्णता किंवा वीज यांच्या प्रवाहाला प्रतिकार करते) गुणधर्म असतात. शेण आणि चिखल यांच्या मिश्रणाने भूमीवर लेप लावल्याने घरातील तापमान स्थिर राहते. उबदार हवामानात ते घरातील तापमान थंड ठेवण्यास साहाय्य करते, तर थंड भागांत ते उष्णता टिकवून ठेवण्यास साहाय्य करते, असे तज्ञांचे मत आहे.

३. सनातन परंपरेत गायीचे शेण हे पवित्रतेचे प्रतीक मानले गेले आहे. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमापूर्वी घराच्या समोरील अंग शेणाने सारवले जाते. शेणामुळे माशा आणि डास घर अन् सभोवताली फिरकत नाहीत. कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी शेण फार प्रभावी आहे.

संपादकीय भूमिका 

  • प्राचार्यांच्या या कृतीमुळे त्यांना कथित विज्ञानवाद्यांनी ‘बुरसटलेले’, ‘मागासलेले’ म्हणून हिणवले, तर आश्चर्य वाटणार नाही ! 
  • गोमातेचे रक्षण करण्यासाठी अशा प्रकारचे संशोधन करण्यासाठी सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे !