बंगालमधील प्रसिद्ध जगन्नाथ रस्त्यावरील ऐतिहासिक स्मारकांची सूची प्रकाशित

प्राचीन चंद्रकोन राजबारी वास्तू
श्री जगन्नाथ मंदिराशी संबंधित प्राचीन वास्तू

कोलकाता – ‘द इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अ‍ॅण्ड कल्चरल हेरिटेज’ (इंटॅक) ने  बंगालमधील प्रसिद्ध जगन्नाथ रस्त्यावरील (जगन्नाथ सडक) ऐतिहासिक स्मारकांची सूची नुकतीच प्रकाशित केली. कोलकाता येथील भारतीय वस्तूसंग्रहालयाच्या सभागृहात पार पडलेल्या एका कार्यक्रमात ‘इंटॅक’ चे अध्यक्ष मेजर जन. (निवृत्त) एल्.के. गुप्ता यांच्या हस्ते या सूचीचे प्रकाशन करण्यात आले. यापूर्वी ‘इंटॅक’ ने ओडिशा राज्यातील जुन्या जगन्नाथ रस्त्यावरील (जगन्नाथ सडक येथील) स्मारकांची सूची घोषित केली होती.

देशातील मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अमूल्य सांस्कृतिक वारसा जपणे आवश्यक आहे, असे श्री. गुप्ता यांनी या वेळी सांगितले. वरील सूचीचा समावेश असलेला हा अहवाल ३ खंडांत प्रसिद्ध करण्यात आला असून त्यामध्ये ४०० स्मारकांची नोंद आहे. यामध्ये ४०० नकाशे आणि १ सहस्र छायाचित्रे यांचा समावेश आहे. भारतीय वस्तूसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजेश पुरोहित यांनी हा प्रकल्प राबवल्याविषयी ‘इंटॅक’ चे अभिनंदन केले.

या प्रकल्पाचे समन्वयक श्री. अनिल धीर यांनी या वेळी बोलतांना बंगाल आणि ओडिशा या राज्यांतील सांस्कृतिक परंपरेविषयीचे विविध पैलू उलघडून सांगितले. या प्राचीन रस्त्यांची निर्मिती करून त्याच्या बाजूला मठ आणि इतर स्मारके उभारणारे श्री चैतन्य अन् गौदिया वैष्णवांच्या उपयुक्ततेविषयी त्यांनी विचार मांडले. ते म्हणाले, ‘‘गुरु नानक, नामदेव, रामानंद, तुलसीदास, माधव आचार्य, कबीर यांसारख्या थोर संतांनी या स्थळांना भेट देऊन आपल्याला अमूल्य ठेवा दिला आहे. यात्रेकरूंसाठी हा मार्ग महत्त्वाचा मानला जातो, तसेच व्यापारासाठीही या मार्गाचा वापर केला गेला होता. व्यापार्‍यांना विविध सुविधाही या मार्गावर निर्माण केल्या गेल्या होत्या. मूळ ५१२ कि.मी. लांबीचा हा मार्ग आता १६८ कि.मी. एवढाच अबाधित राहिला आहे. इतर भागांवर महामार्ग आणि रेल्वे यांनी अतिक्रमण केले आहे.’’


Multi Language |Offline reading | PDF