सर्वोच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी यांना फटकारले

भ्रमणभाष क्रमांक आधारकार्डशी जोडण्याच्या सक्तीला आव्हान दिल्याचे प्रकरण

केंद्र सरकारच्या निर्णयाला राज्य सरकार आव्हान कसे देऊ शकते ?

नवी देहली – भ्रमणभाष क्रमांक आधारकार्डशी जोडण्याच्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चांगलेच फटकारले. ‘केंद्र सरकारच्या निर्णयाला राज्य सरकार कसे आव्हान देऊ शकते’, असा प्रश्‍न न्यायालयाने त्यांना विचारला. न्यायालयाने ममता बॅनर्जी यांच्या या याचिकेवर तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली.

‘केंद्राच्या या निर्णयाविषयी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काही समस्या अथवा आक्षेप असतील, तर त्यांनी स्वतः सामान्य नागरिकाप्रमाणे याचिका दाखल करावी. सरकारी पदाचा वापर करून याचिका दाखल करू नये’, अशा शब्दांत न्यायालयाने ममता बॅनर्जी यांना तंबी दिली. (पदाचा दुरुपयोग करणार्‍यांवर केंद्र सरकारने कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा ! – संपादक)

भ्रमणभाष क्रमांक आधारकार्डशी जोडण्याच्या अनिवार्यतेला बॅनर्जी यांचा तीव्र विरोध होता. ‘माझा भ्रमणभाष क्रमांक बंद केला तरी चालेल; पण मी माझा भ्रमणभाष क्रमांक आधारकार्डशी जोडणार नाही’, असे त्यांनी घोषित केले होते. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सरकार आणि भ्रमणभाष आस्थापने यांनाही नोटीस पाठवली आहे.


Multi Language |Offline reading | PDF