जोतिबा यात्रा विशेष

कोल्हापूर, १० एप्रिल (वार्ता.) – ‘शिवाजी चौक तरुण मंडळा’च्या वतीने जोतिबा यात्रेसाठी येणार्या भाविकांसाठी पंचगंगा नदीच्या काठावर ११, १२ आणि १३ एप्रिल या दिवशी विनामूल्य अन्नछत्र चालू करण्यात येत आहे. गेली ३१ वर्षे चालू असलेल्या या अन्नछत्राद्वारे ५० सहस्रांहून अधिक भाविकांची सोय करण्यात येते. विशेषकरून महाराष्ट्राबाहेरून कर्नाटक, आंध्रप्रदेश येथून जे भाविक येतात, त्यांना याचा पुष्कळ लाभ होतो. अन्नछत्रासाठी सर्वश्री सुहास भेंडे, सागर पोवार, राकेश वडणेकर यांसह १५० हून अधिक कार्यकर्ते ३ दिवस अविश्रांत सेवा देतात.
सुहास भेंडे म्हणाले, ‘‘माजी महापौर नंदकुमार वळंजू अध्यक्ष असलेल्या आमच्या शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीने भाविकांसाठी अल्पाहार आणि महाप्रसाद यांची सोय करण्यात येते. प्रसाद घेतांना गोंधळ होऊ नये; म्हणून आम्ही प्रत्येक भाविकाला ‘कूपन’ देतो. त्यामुळे भाविक रांगेतच प्रसाद ग्रहण करतात. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याचीही सोय मंडळ करते. ज्या काळी भाविकांना कुणीही प्रसाद देत नसत, त्या काळापासून आमचे कार्यकर्ते भाविकांना केवळ सेवा म्हणून विनामूल्य प्रसाद देत आहेत. यात्रेसाठी येणार्या भाविकांसाठी काहीतरी केल्याचे समाधान या निमित्ताने आम्हाला मिळते.’’
भाविकांसाठी पंचगंगा नदीवर स्नानाची सोय
कोल्हापूर, १० एप्रिल (वार्ता.) – जोतिबा यात्रेसाठी जे भाविक पंचगंगा नदीवर स्नानासाठी येतात, त्यातील महिला भाविकांसाठी बंदिस्त ठिकाणी स्नान करण्याची सोय, तसेच पुरुष भाविकांसाठी स्नान करण्यासाठी विशेष सोय पंचगंगा आरती भक्तमंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. मंडळाच्या वतीने गेली अनेक वर्षे ही सोय करण्यात येत आहे. पंचगंगा आरती मंडळाच्या वतीने गेली अनेक वर्षे सायंकाळी ६ वाजता पंचगंगा नदीची आरती करण्यात येते. या सेवाकार्यात सर्वश्री राजेंद्र बुचडे, प्रफुल्ल भाट, चंद्रकांत हांडे, अवधूत भाट, सुधाकर भांदिगरे, भरत वासकर, स्वप्नील मुळे यांसह अन्य कार्यकर्त्यांचा सहभाग आहे.