श्री तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

धाराशीव – श्री भवानीदेवीचे मंदिर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. सध्या मंदिराचे जे काम मंदिर संस्थान आणि पुरातत्व विभाग यांच्या वतीने चालू आहे, ते पाहून मंदिराचा प्राचीन ठेवा नष्ट करण्याचा चंगच बांधला आहे, असे दिसते. मंदिरात ‘पेव्हिंग ब्लॉक’ बसवणे, ‘सँड ब्लास्टिंग’, सिमेंटचे बांधकाम यांमुळे मंदिरातील मूळ दगडाला धोका निर्माण झाला आहे. मंदिरात सध्या चालू असलेले सर्व काम हे संवर्धनाच्या नियमांशी सुसंगत नाही. त्यामुळे श्री तुळजाभवानीदेवी मंदिरातील चुकीच्या पद्धतीने चालू असलेले संवर्धन आणि जिर्णाेद्धार तात्काळ थांबवावा, या मागणीचे निवेदन ‘श्री तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळा’च्या वतीने धाराशीवचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. (असे निवेदन का द्यावे लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ? मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम समजायचे का ? – संपादक)
या प्रसंगी ‘श्री तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळा’चे अध्यक्ष श्री. अमरराजे अंबादासराव कदम-परमेश्वर, उपाध्यक्ष श्री. सचिन पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते.
१. राज्याच्या पुरातत्व विभागाच्या वतीने ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ न करता पुण्याच्या ‘इंजोटेक इंडिया’ या आस्थापनाकडून ते करून घेतले. यानंतर मंदिरात चुकीच्या पद्धतीने बांधकाम होत आहे. गर्भगृहातील पूर्वीच्या दगडी बांधकामावरती फरशीसह भिंतीवरती लावलेले संगमरवर काढले गेल्याने मूळ पृष्ठभाग उघडा झाला आहे. राज्य पुरातत्व विभाग, मंदिर संस्थान आणि संग्रहालयाचे अधिकारी यांनी हे काम अत्यंत काळजीपूर्वक करणे अपेक्षित आहे; मात्र तसे होतांना दिसत नाही.
२. मंदिराचे शिखर पूर्णत: पाडल्यास ऐतिहासिक आणि पुरातत्वीय मूल्य पुढच्या पिढीला पहायला मिळणार नाहीत.
३. श्री तुळजाभवानीदेवी मंदिर हे संरक्षित घोषित केलेले स्मारक आहे आणि महाराष्ट्र पुरातन कायदा १९७७ आणि १९९९ च्या कायद्यांनुसार पूर्ण संरक्षित आहे. ज्यात संरक्षित स्मारकांची मूळ वैशिष्ट्ये खराब करणे किंवा त्यात पालट करणे पूर्णपणे निषिद्ध आहे. असे असतांना भवानी शंकर समोरील सभामंडप मोठ्या प्रमाणात दुरुस्त करतांना तेथील चांदीचे द्वार मोठे करण्यात आले. यात मंदिर संस्थानने पुरातत्व विभागाची अनुमती चांदीचा उंबरठा काढला असून तो परत आहे तसा बसवून हिंदु धर्मशास्त्रातील पावित्र्य राखावे.
४. यापूर्वी पुरातत्व विभागाची अनुमती न घेता पुरातन भिंती पाडून नव्याने बांधकाम केल्याने मंदिर संस्थानच्या तहसीलदारांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
५. आम्ही श्री तुळजाभवानीदेवी मंदिर आणि शहराचा विकास यांसाठी आग्रही आहोत; मात्र देवीच्या मंदिरातील आध्यात्मिक, शास्त्रीय गोष्टी, पावित्र्य, पुरातन स्थापत्य यांचे संवर्धन आणि जतन व्हावे.
६. हे काम चालू करण्याच्या पूर्वी पुरातत्व शास्त्रज्ञ, देवीचे मुख्य भोपे-पुजारी, तुळजापुरातील मंत, पाळकर, उपाध्ये, संवर्धन तज्ञ यांची समिती नेमणे आवश्यक होते. तसे न करता सध्या होत असलेले काम हे चुकीच्या पद्धतीने होत असल्याने ते तात्काळ बंद करावे; अन्यथा आम्हाला न्यायालयाचा मार्ग अवलंबवावा लागेल.