जोतिबा यात्रेसाठी पंचगंगा नदी घाटावर सुविधा द्या ! – किशोर घाटगे, शिवसेना, उपजिल्हाप्रमुख

पंचगंगा घाट

कोल्हापूर, ९ एप्रिल (वार्ता.) – जोतिबा देवाच्या यात्रेसाठी १० लाख भक्त उपस्थित असतात. या यात्रेसाठी विविध सासनकाठ्या आणि यात्रेकरू पंचगंगा घाटावर येतात. स्नान आणि धार्मिक विधी आटोपून हे यात्रेकरू जोतिबा डोंगरावर जातात. तरी यासाठी पंचगंगा घाटावर अनेक सुविधा देणे आवश्यक आहे. पंचगंगा घाटावर महिलांना स्नानासाठी स्वतंत्र सुविधा करावी, तसेच कपडे घालण्यासाठी स्वतंत्र सुविधा करावी. येथे स्नान करणार्‍या महिलांचे भ्रमणभाषवर चित्रीकरण करणार्‍या युवकास हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी चोप दिला होता. तरी जोतिबा यात्रेसाठी पंचगंगा नदी घाटावर सुविधा द्या, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.

या पत्रकात पुढे म्हटले आहे की, घाटावर कपडे, भ्रमणभाष, तसेच किमती मूल्यांच्या वस्तूंच्या चोर्‍या होऊ नयेत; म्हणून कायमस्वरूपी बंदोबस्त ठेवावा. घाटावर पुरेसा विद्युत पुरवठा ठेवावा. यात्रा कालावधीत केवळ जोतिबा डोंगरावरच प्रशासनाचे लक्ष असून प्रशासनाने पंचगंगा नदी घाटावरील व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाले आहे. तरी वरील सूचना प्रशासनाने त्वरित कृतीत आणाव्यात. (ज्या त्रुटी एका हिंदुत्वनिष्ठ पक्षाच्या पदाधिकार्‍याच्या लक्षात येतात, त्या त्रुटी सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनाच्या का लक्षात येत नाहीत ? प्रशासन भाविकांना सुविधा देण्यात पुढाकार कधी घेणार ? – संपादक )