कोल्हापूर, ९ एप्रिल (वार्ता.) – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली जोतिबा यात्रा चालू झाली असून १२ एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने गतवर्षीपेक्षा पिण्याच्या पाण्याचे साठे वाढवलेले आहेत. भाविकांसाठी अतिरिक्त स्वच्छतागृहे बसवण्यात आली असून आरोग्य शिबिरांचे आयोजन केलेले आहे. धर्मादाय रुग्णालयांनाही सेवा देण्यासाठी आवाहन करण्यात आलेले आहे. यात्रेत जो गुलाल वापरण्यात येतो त्यात भेसळ होऊ नये, यासाठी आम्ही अन्न-औषध प्रशासनाकडून पडताळणी करत आहोत. जोतिबा यात्रेत येणार्या भाविकांना सर्व सुविधा देण्यासाठी प्रशासन सिद्ध आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ला दिली.

श्री. नाईकवाडे पुढे म्हणाले की, येणार्या भाविकांना चांगल्या प्रकारे सुविधा देण्यासाठी व्हाईट आर्मी, तसेच अन्य स्वयंसेवकांच्या माध्यमातून आम्ही सेवा पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत. यात्रा कालावधीत जे भाविक खोबर्याची उधळण करतात, त्या भाविकांना आम्ही छोट्या वाट्यांची उधळण करण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकार्यांनी केलेल्या आवाहनानुसार यंदाची यात्रा ही प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असून २५ सहस्र कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यात्रेनंतर कोल्हापूर शहरात दुसर्या दिवशी जी नगरप्रदक्षिणा होते, तिची सर्व सिद्धता पूर्ण झाली आहे. यासाठी जो रथ वापरण्यात येतो, त्याची स्वच्छता पूर्ण झालेली आहे. त्या मार्गाची पूर्ण पहाणी झालेली आहे.