कर्जबाजारी तरुणाची आत्महत्या !

खोपोली (जिल्हा रायगड) – खोपोली शहरातील सुनील नडवीरमणी (वय ३२ वर्षे) याने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. ‘ऑनलाईन रमी’च्या नादात तो कर्जबाजारी झाला होता.
मुंबई-गोवा मार्गावर रो रो बोट सेवा !

मुंबई – मुंबई-गोवा मार्गावर लवकरच रो रो बोट सेवा चालू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना समुद्रमार्गे मुंबई ते गोवा असा प्रवास अनुभवता येणार आहे. हा प्रवास ६ घंट्यांचा आहे. या बोटीची एकाच वेळी ६२० प्रवासी आणि ६० वाहने वाहून नेण्याची क्षमता असणार आहे. एप्रिलच्या शेवटी किंवा मेच्या प्रारंभी ही वाहतूक चालू होऊ शकते.
वसईतून अमली पदार्थाचा साठा हस्तगत

वसई – येथे ११ कोटी ५८ लाख ४१ सहस्र १०० रुपये किमतीचा २२ किलो ८६५ ग्रॅम मॅफेड्रॉन आणि ४८ ग्रॅम कोकेन सापडले आहे. या प्रकरणी व्हिक्टर ओनुवाला उपाख्य डाईक रेमंड या नायजेरियन आरोपीला अटक केली आहे. त्याच्या घरात डाईक रेमंड या नावाचे बनावट पारपत्र, तसेच नायजेरिया देशाच्या ईग्वेनुबा लेगॉस याचे पारपत्र मिळाले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. (लोकांना नशेच्या आहारी घालून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्या आरोपींना कठोर शिक्षा झाल्यास असे गुन्हे करणार्यांना वचक बसेल ! – संपादक)
२ महिलांवर आक्रमण, ७ जणांविरोधात तक्रार
मराठीत बोलण्याचा केला होता आग्रह
डोंबिवली – इमारतीच्या आवारातून दुचाकी नेणार्या महिलांनी तेथील तरुणाला ‘एक्सक्युज मी’ असे म्हणून बाजूला होण्याची विनंती केली. तेव्हा त्याने मराठीतून बोलण्याविषयी महिलांना धमकावले. त्याच्या कुटुंबियांनी या महिलांवर आक्रमण केले. या प्रकरणी ७ जणांच्या विरुद्ध तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
दीनानाथ रुग्णालयावर महिला आयोगाकडून कारवाईचे निर्देश !
मुंबई – पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतरच्या अंतर्गत चौकशीचा अहवाल भिसे कुटुंबियांच्या अनुमतीविनाच सार्वजनिक केला. या प्रकरणी राज्य महिला आयोगाने पुण्याचे पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल यांना तातडीने कारवाई करण्याचे, तसेच या कारवाईचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ‘एक्स’ खात्यावरून दिली आहे. अहवाल सार्वजनिक केल्याप्रकरणी मृत तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून आयोगाने वरील आदेश दिला.