‘ज्ञानकुल’च्या ज्ञानोत्सवात यंदा ‘अखंड भारत’ संकल्पनेवर प्रदर्शन !

मुंबई, ९ एप्रिल – चेंबूर येथील ‘ज्ञानकुल बाल विकास संघा’चा प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही १० ते १२ एप्रिल या कालावधीत वार्षिकोत्सव अर्थात ‘ज्ञानोत्सव’ साजरा होत आहे. यंदा ‘अखंड भारत’ संकल्पनेवर आधारित हा महोत्सव असेल.

भारतातील राजे-महाराजे, क्रांतीकारक, संत, वीरांगना, कर्तृत्ववान महिला, प्राचीन ग्रंथ या विषयांवर प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. या प्रदर्शनातून भारतीय विचार, सकारात्मक दृष्टीकोन, संस्कृती आणि भारताचा ५ सहस्र वर्षांचा इतिहास समाजापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न ज्ञानकुलचे विद्यार्थी करणार आहेत. हा ज्ञानोत्सव १० ते १२ एप्रिल या कालावधीत सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत ज्ञानकुल बाल विकास संघ, चेंबूर येथे होईल.

दूरदर्शनवरील ‘महाभारत’ मालिकेतील ‘भीष्म पितामह’ यांची अजरामर भूमिका साकारणारे अभिनेते श्री. मुकेश खन्ना या प्रदर्शनाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील. अधिक माहितीसाठी ९७५७४०१०२२ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन ज्ञानकुल बाल विकास संघाने केले आहे.