मुंबईत वीजपुरवठा खंडित झाल्यासही अत्यावश्यक सेवा चालू रहाणार !

टाटा पॉवर १०० मेगावॅट क्षमतेचे ‘बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम’ उभारणार !

मुंबई – भारतातील सर्वांत मोठे एकात्मिक वीज आस्थापन आणि मुंबईत सुमारे ८ लाख निवासी आणि व्यावसायिक ग्राहकांना वीजपुरवठा करणार्‍या टाटा पॉवरला १०० मेगावॅट क्षमतेचे ‘बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम’ उभारण्यासाठी ‘महाराष्ट्र वीज नियामक आयोगा’ने मान्यता दिली आहे. ही प्रणाली अत्याधुनिक ‘ब्लॅक स्टार्ट’ पर्यायाने सुसज्ज असलेली आहे. ‘ग्रिड’मध्ये अडथळा निर्माण झाल्यास मेट्रो, रुग्णालये, विमानतळ आणि डेटा सेंटरसह महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना वीजपुरवठा जलदगतीने पुनर्संचयित करेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे ‘ब्लॅकआऊट’ (वीजपुरवठा बंद होणे) टाळता येतील. मुंबईच्या वीजवितरण प्रणालीची लवचिकता वाढेल.

१. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान ‘रिॲक्टिव्ह पॉवर’ व्यवस्थापन अनुकूल करील, मागणी व्यवस्थापनाची कार्यक्षमता सुधारेल आणि शहराच्या वीजप्रणालीला बळकटी देईल.

२. विजेच्या उच्च मागणीच्या काळातही स्थिर आणि संतुलित वीजपुरवठा सुनिश्चित करील, तसेच अल्प दराच्या काळात वीज साठवून आणि उच्च दराच्या काळात तिचा वापर करून वीज खरेदी खर्च न्यून करण्यास साहाय्य करील. यामुळे भविष्यात ग्राहकांसाठी अधिक अल्प दर सुनिश्चित करता येतील.

३. संपूर्ण १०० मेगावॅटची ही प्रणाली १० मोक्याच्या ठिकाणी, विशेषतः मुंबई वितरणातील लोड सेंटर्सजवळ स्थापित केली जाईल. तिचे केंद्रीय निरीक्षण आणि नियंत्रण टाटा पॉवरच्या ‘पॉवर सिस्टम कंट्रोल सेंटर’ (‘पी.एस्.सी.सी.’) कडून केले जाईल. येणार्‍या काळात या प्रणालीचे ‘डिस्ट्र्रिब्युटेड एनर्जी रिसोर्स मॅनेजमेंट’ सिस्टममध्ये एकत्रीकरण करण्याची योजना आहे.

४. अक्षय ऊर्जेचा वापर वेगाने होत असतांना सुरळीत ऊर्जा संक्रमण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. पारंपरिक पर्यायांच्या तुलनेत अल्प कालावधीत अधिक किफायतशीर, जलद-उपयोगात आणू शकणारा हा उपाय आहे.