|
पणजी, ९ एप्रिल (वार्ता.) – जुन्या घराच्या दुरुस्तीसाठी पंचायत सचिवांनी ३ दिवसांत परवाना देणे गोवा सरकारकडून बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे जुन्या घरात रहाणार्या गोमंतकियांना दिलासा मिळाला आहे. अर्जदाराने मागील ५ वर्षांची घरपट्टी भरलेली असेल आणि घर कायदेशीरदृष्ट्या नोंदणीकृत असेल, तर आहे त्याच जागी घराची दुरुस्ती करण्यासाठी लगेच परवाना मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ९ एप्रिल या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
पंचायत संचालनालयाच्या संचालिका सिद्धी हळर्णकर यांनी या संदर्भात एक परिपत्रक ९ एप्रिल या दिवशी प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रकानुसार पंचायतीचे सचिव आता गटविकास अधिकार्यांचा ‘साईट इन्स्पेक्शन (घराचे सर्वर्ेक्षण) अहवाल न घेता कामकाजाच्या ३ दिवसांत परवाना देऊ शकतात. यासाठी घर दुरुस्तीच्या परवान्यासंबंधी वर्ष १९९९ आणि २००२ च्या आदेशांमध्ये पालट करण्यात आला आहे. अर्जदाराला घर दुरुस्तीसाठी अर्जासह घराचा नकाशा, छायाचित्रे आणि नोंदणीकृत वास्तूविशारद किंवा ‘स्ट्रक्चरल इंजिनीयर’ यांचा अहवाल द्यावा लागणार आहे. त्यामध्ये दुरुस्तीची शक्यता आणि खर्चाचा अंदाज नमूद केलेला असावा. सचिवांनी ३ दिवसांत निर्णय न घेतल्यास ‘परवाना मिळाला’, असे ग्राह्य धरले जाणार आहे. हा नियम केवळ एकल निवासगृहांच्या दुरुस्तीसाठी लागू करण्यात आला आहे. बहुमजली किंवा एकाहून अधिक घरांच्या संदर्भात मात्र पूर्वीचेच नियम लागू राहणार आहेत.