
कोल्हापूर, ९ एप्रिल (वार्ता.) – जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी ‘सहजसेवा ट्रस्ट’चे गायमुखावर १० ते १३ एप्रिलपर्यंत रौप्य महोत्सवी अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले आहे. वर्ष २००१ पासून चालू केलेले ‘सहजसेवा ट्रस्ट’चे हे २५ वे वर्ष आहे, अशी माहिती ‘सहज सेवा ट्रस्ट’चे संमती मिरजे, प्रमोद पाटील, चिंतन शहा, मनीष पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१. महाराष्ट्रात ज्या अनेक यात्रा भरतात, त्यात जोतिबा देवाची यात्रा सर्वांत मोठी असते. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांतून ७ ते ८ लाख यात्रेकरू मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. या भाविकांसाठी ‘सहजसेवा ट्रस्ट’च्या माध्यमातून विनामूल्य अन्नछत्राची सोय प्रतिवर्षी करण्यात येते. गतवर्षी २ लाखांहून अधिक भाविकांनी याचा लाभ घेतला होता. हे अन्नछत्र २४ घंटे चालू असून भाविकांना २४ घंटे चहा मिळणार आहे अन् दुपारच्या कालावधीत मठ्ठा दिला जाणार आहे.
२. या अन्नछत्रासाठी १५ सहस्र चौरस फुटांचा मोठा मांडव उभारण्यात आला आहे. चहा आणि मठ्ठा यांसाठी स्वतंत्र मंडप उभारण्यात आला आहे.
३. जे भाविक बैलगाडीसह यात्रेसाठी येतात, त्या भाविकांना बैलांसाठी शेंगदाणा पेंड आणि भुसा दिला जातो.
४. भोजन करण्यासाठी २० मुख्य आचारी, त्यांचे साहाय्यक, तसेच अन्य विविध कामांसह ‘सहजसेवा ट्रस्ट’चे ४०० स्वयंसेवक अहोरात्र काम करणार आहेत.
५. प्रतिवर्षीप्रमाणे ‘छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालया’च्या साहाय्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. ज्या दानशूर व्यक्ती अथवा संस्थांना या उपक्रमास साहाय्य करायचे आहे, त्यांनी ७४४७४१२७५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.