मी पवित्र संगमात बुडी मारली आणि त्या त्रिवेणी नदीला विचारले, ‘माझी पापे जमा करून घेतली का ?’ नदीने उत्तर दिले, ‘होय.’ मी विचारले, ‘तुम्ही त्यांचे काय करणार ?’ त्रिवेणी नदी खुदकन हसली, ‘ती ठेवून घ्यायला मी काय वेडी आहे का ? मी ती समुद्रात सोडून देणार.’ उत्सुकतेने मी समुद्राकडे जाऊन त्याला विचारले, ‘माझी पापे त्रिवेणीकडून मिळाली का ?’ समुद्राने उत्तर दिले, ‘होय.’ मी विचारले, ‘तुम्ही त्यांचे काय करणार ?’ समुद्र हसला, ‘मी वेडा आहे का ती ठेवून घ्यायला ? मी ती ढगांमध्ये जमा करणार.’ मी ढगांकडे गेलो आणि विचारले, ‘तुम्हाला समुद्राकडून माझी पापे मिळाली का ?’ ढगांनी उत्तर दिले, ‘होय.’ मी विचारले, ‘तुम्ही त्यांचे काय करणार ?’ ढग कुजबुजले, ‘आम्ही वेडे आहोत काय ती ठेवायला ? आम्ही त्यांचा पावसासारखा खाली वर्षाव करू.’ मी विचारले, ‘कुणावर ?’ ढग खट्याळपणे हसले, ‘तुझ्यावर, अर्थातच.’
मला अचानक जाणीव झाली की, आपण कुठेही असू, कर्म आपल्या मागोमाग येते. ही सृष्टी आपल्याला आठवण करून देते, ‘नीतीमान रहा आणि चांगले वर्तन करा; कारण स्वतःचे कर्म शेवटी आपल्याकडे परतते.’
– युवराज, एक धर्मप्रेमी