‘सौ. सुगंधा कांबळी या २७ वर्षांपासून सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करत आहेत. त्यांनी विविध सेवा तळमळीने आणि भावपूर्ण केल्या आहेत. आता त्यांना वयोमानानुसार शारीरिक अडचणी आहेत, तरीही त्यांच्यामधील सेवेविषयीची तळमळ आणि आध्यात्मिक भाव प्रतिदिन वृद्धींगत होत आहे. त्या घरी असतांनाही प्रत्येक कृती साधना म्हणून करण्याचा प्रयत्न करतात.

१. सौ. कांबळी सतत शिकण्याच्या स्थितीत असतात. त्या प्रत्येकाकडून शिकण्याचा प्रयत्न करतात.
२. निर्मळ मन
अ. त्या मनाने अतिशय निर्मळ आहेत. त्यांच्या मनात कुणाविषयी पूर्वग्रह किंवा प्रतिक्रिया नसतात. ‘सर्व साधक गुरुदेवांचीच रूपे आहेत’, या भावाने त्या सर्वांशी प्रेमाने, नम्रतेने आणि आदराने वागतात.
आ. ‘नातेवाईक साधकच आहेत’, या भावाने त्या नातेवाइकांशी वागतात. त्यांच्या मनात कधी नातेवाइकांच्या संदर्भात अयोग्य विचार आल्यास त्या देवाकडे क्षमायाचना करतात आणि स्वभावदोष निर्मूलन पद्धतीत सांगितल्याप्रमाणे स्वयंसूचना घेतात.
३. व्यष्टी साधनेचे गांभीर्य
३ अ. पहाटे लवकर उठून नामजप आणि स्वयंसूचना सत्रे करणे : त्या पहाटे लवकर उठून नामजप करतात. त्या सकाळी उठल्यावर भगवान श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना करून दिवसाचा आरंभ करतात. नंतर त्या स्वत:वरील आवरण काढून स्वयंसूचना सत्र करतात. त्या प्रतिदिन २ घंटे बसून नामजप करतात. त्या नामजप करत असतांना ‘त्यांच्या एका बाजूला श्रीकृष्ण आणि दुसर्या बाजूला प.पू. गुरुदेव बसले आहेत अन् ते दोघे माझ्याकडून नामजप करून घेत आहेत’, असा भाव ठेवतात. त्यांचा नामजप एकाग्रतेने होतो. त्यांना नामजप केल्यावर आनंद मिळतो. त्या प्रतिदिन किमान पाच स्वयंसूचना सत्रे करतात.
३ आ. सारणी लिखाणात सातत्य असणे : त्या प्रतिदिन सारणी लिखाण करतात. त्या दिवसभरात चार तरी चुका सारणीत लिहितात. ‘सारणी पहायला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले येतात, तर प्रतिदिन चुका लिहायलाच हव्यात’, असा त्यांचा भाव असतो.

३ इ. चिकाटीने आढावा देणे : त्या चिंतन सारणीतील सर्व सूत्रे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामध्ये त्यांचे सातत्य आणि चिकाटी असते. रात्री कितीही उशीर झाला, तरीही त्या चिंतन सारणी लिहून आढावा पाठवतात.
४. अल्प अहं
त्या कर्तेपणा देवाला अर्पण करतात. ‘गुरुदेवच सर्व काही करणार आहेत’, असा त्यांचा भाव असतो. ‘गुरुदेवच माझ्या माध्यमातून समष्टी सेवा करत आहेत’, या भावाने त्या प्रयत्न करतात.
५. दैनंदिन कृती करतांना ठेवत असलेला आध्यात्मिक भाव
अ. त्या सकाळी घरातील केर काढत असतांना ‘आश्रमातीलच केर काढत आहे. गुरुदेव मन स्वच्छ करत आहेत’, असा भाव ठेवतात. त्यानुसार त्यांची प्रार्थना होते. ‘दिवसभर घरात म्हणजेच आश्रमातील चैतन्यामध्येच चालत आहे, सेवा करत आहे’, या भावाने त्या घरातील सर्व कामे सेवा म्हणून करतात.
आ. त्या प्रतिदिन पोळ्यांसाठी कणिक भिजवण्यापूर्वी प्रार्थना करतात. त्या गणपति आणि सरस्वतीदेवी यांना सांगतात, ‘‘मी प.पू. गुरुदेव आणि आश्रमातील सर्व साधक यांच्यासाठी पोळ्या बनवत आहे.’’ (‘घरातील सर्व जण साधक आहेत’, असाही त्यांचा भाव असतो.) त्या पोळ्या करत असतांना त्यांचा अखंड नामजप चालू असतो. त्या महाप्रसाद बनवत असतांना ‘गुरुदेवांसाठी महाप्रसाद बनवत आहे’, असा भाव ठेवतात.
इ. त्या पाणी पितांना ‘गुरुदेवांच्या चरणांचे तीर्थ ग्रहण करत आहे’, असा भाव ठेवतात.
ई. त्या सतत भावावस्थेत असतात.
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सौ. सुगंधा कांबळी यांच्यासारखे साधक देऊन आम्हाला पुष्कळ शिकवले’, त्याबद्दल मी श्री गुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते. ‘सौ. सुगंधा कांबळी यांची आध्यात्मिक प्रगती लवकर होऊ दे’, अशी मी श्री गुरुचरणी प्रार्थना करते.’
– सुश्री (कु.) संगीता प्रभाकर नाईक, पणजी, गोवा. (२०.२.२०२५)