रामनवमीचे महत्त्व !

१. तिथी

रामनवमी उत्सव चैत्र शुक्ल नवमी तिथीला साजरा करतात.

२. इतिहास

श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीरामाच्या जन्माप्रीत्यर्थ रामनवमी साजरी करतात. या दिवशी पुष्य नक्षत्रावर, माध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी ५ ग्रह असतांना अयोध्येत श्रीराम जन्मले.

३. महत्त्व

देवता अन् अवतार यांच्या जन्मतिथीला त्यांचे तत्त्व भूतलावर जास्त प्रमाणात कार्यरत असते. या दिवशी श्रीरामतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. रामनवमीला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप, तसेच श्रीरामाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीरामतत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास साहाय्य होते.

४. रामनवमी उत्सव भावपूर्ण होण्यासाठी हे करा !

अ. स्त्रियांनी नऊवारी साडी अन् पुरुषांनी सदरा-धोतर/पायजमा अशी सात्त्विक वस्त्रे परिधान करून रामनवमी उत्सवात सहभागी व्हावे.

आ. विद्यार्थ्यांसाठी ‘श्रीरामरक्षास्तोत्र’ पठणाच्या स्पर्धा, अखंड रामनामजप असे कार्यक्रम आयोजित करावेत.

इ. उत्सवाच्या ठिकाणी कर्णकर्कश संगीत लावणे, विद्युत रोषणाई करणे अशा रज-तम निर्माण करणार्‍या कृती करू नयेत.

ई. मिरवणुकीत टाळ, मृदुंग अशी सात्त्विक वाद्ये वापरावीत.

५. उत्सव साजरा करण्याची पद्धत

‘कित्येक राममंदिरांतून चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव चालतो. रामायणाचे पारायण, कथाकीर्तन आणि राममूर्तीला विविध शृंगार अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो. नवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचे कीर्तन होते. माध्यान्हकाळी, कुंची (बाळाच्या डोक्याला बांधायचे वस्त्र. हे वस्त्र पाठीपर्यंत असते.) घातलेला नारळ पाळण्यात ठेवून तो पाळणा हालवतात आणि भक्तमंडळी त्यावर गुलाल अन् फुले उधळतात. (काही ठिकाणी नारळाऐवजी श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवतात. – संकलक) याप्रसंगी श्रीरामाचा पाळणा (रामजन्माचे गीत) म्हटला जातो.’ श्रीरामाच्या मूर्तीची पूजा करून प्रसाद म्हणून सुंठवडा देतात. काही ठिकाणी सुंठवड्यासह महाप्रसादही देतात.

(संदर्भ – सनातन संस्थेचे संकेतस्थळ)