स्वतःमध्ये ‘संयम’ या गुणाची वृद्धी करून सुखी होऊया !

‘सध्याच्या कलियुगात तमोगुणाचा प्रभाव सर्वांत अधिक आहे. बहुतांश व्यक्तींत प्रसंगपरत्वे संयमाचा अभाव आढळतो. १४ मार्चच्या लेखात आपण ‘संयम म्हणजे काय ? जीवनात संयम बाळगण्याचे महत्त्व’, या सूत्रांविषयी जाणून घेतले. या लेखात ‘संयमाच्या अभावामुळे होणारी हानी, संयम वाढवण्यासाठी करायची उपाययोजना आणि संयम असण्याचे लाभ’, यांविषयी जाणून घेऊया.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/892471.html

श्री. अशोक लिमकर

३. संयमाच्या अभावामुळे होणारी हानी

अ. संयमाच्या अभावाने सर्व जग इंद्रियाधीन झाले आहे. मोठमोठे बलवान योद्धे आणि विचारशील विद्वानही इंद्रियांचे दास बनून त्यांच्या तृप्तीसाठी अधिक वेळ वाया घालवतात. त्यामुळे त्यांची जीवनशैली बिघडून ते अधःपतीत जीवन जगू लागतात.

आ. ‘संयम आणि संकल्प’ यांच्या अभावामुळे व्यक्तीमध्ये क्रोध, भय, हिंसा आणि व्याकुळता निर्माण होऊन त्याची जीवनशैली बिघडते.

इ. मानसिक संयम, विशेषतः वाणीवरील संयमाच्या अभावामुळे आपले मन कलुषित होऊन आजूबाजूचे वातावरण गढूळ बनते.

ई. असंतुष्ट मन असलेल्या मनुष्यामध्ये कधीही संयम असत नाही.

४. संयम वाढवण्यासाठी करायची उपाययोजना

अ. स्वाध्याय, चिंतन आणि मनन यांमुळे संयम वाढतो.

आ. समस्येमधून शिकण्याची वृत्ती वाढवली, तर संयम वाढतो.

इ. संयम पालनासाठी मन कणखर असणे आवश्यक आहे. ‘भ्रामरीसारखे वेगवेगळे प्राणायाम आणि ॐकाराचा वारंवार उच्चार’ यांमुळे मन कणखर होण्यास साहाय्य होते. व्यक्तीला शिक्षणामध्ये अग्रेसर होता येते. ‘सूर्यनमस्कार, आसने आणि उपासना’ यांमुळेही शारीरिक अन् मानसिक स्थिती कणखर होऊन संयम वाढायला साहाय्य होते.

ई. ‘ध्यान-धारणा, समाधी आणि प्राणायाम’ यांचा अभ्यास केल्याने मन स्थिर आणि शांत होऊन संयम वाढतो.

उ. मन चंचल झाले असल्यास चांगले कर्म किंवा वाचन यांमध्ये मन गुंतवल्यास संयम वाढण्यास साहाय्य होते.

ऊ. दिवसभरात प्रत्येकी २ – ३ घंट्यांनी १ ते २ मिनिटे वेळ काढून स्वतःकडे तटस्थपणे पहावे. आपला चेहरा, मन, विचार, भावना आणि कृती यांच्या संदर्भात निरीक्षण करावे. यामुळे आपल्यात संयम वाढतो आणि आपल्यात परिवर्तन घडत असल्याचे अनुभवायला येईल.

ए. संयमामध्ये इंद्रियांवर नियंत्रण असते, तर दमनामध्ये इंद्रिये दाबून ठेवली जातात. ‘दाब सुटल्यावर त्यातील शक्ती उफाळून येते आणि अनर्थ घडवते’, यासाठी साधनेमध्ये आपल्या वृत्ती दाबून ठेवण्याऐवजी नियंत्रित करायला सांगितले जाते.

५. संयम असण्याचे लाभ

अ. संयम म्हणजे कोणतीही कृती किंवा प्रसंग यांमध्ये अंतर्मुख होऊन जागरुकतेने भविष्याचा वेध घेऊन योग्य निर्णयाप्रत येणे. सुविचाराने कुविचारांवर मात करता येते.

आ. संयमामुळे एकाग्रता वाढून योग्य निर्णय घेणे सुलभ होते. संयमामुळे योग्य प्रतिक्रिया दिली जाते. मनुष्याच्या सुखी जीवनात संयमाचा पुष्कळ मोठा सहभाग असतो.

इ. संयमाने मन शांत होऊन सर्व इच्छांवर नियंत्रण ठेवल्याने मनुष्य जीवनात सफलता प्राप्त करू शकतो.

ई. संयमाची पहिली पायरी संतोष आहे. जीवनात आतापर्यंत प्राप्त झालेल्या अनेक गोष्टींचा आनंद घेण्याऐवजी मनुष्य पूर्ण न झालेल्या इच्छा आणि आकांक्षा यांच्या पूर्तीच्या मागे लागला, तर त्याला दुःखच प्राप्त होते.

उ. संयमी व्यक्ती शांत आिण प्रसन्न स्वभावाची असते. ती व्यक्ती जीवन हसत-खेळत, खुशीने आणि सुखाने जगत असते. तिच्या जीवनात समस्या उद्भवली, तरीही ती अस्वस्थ होत नाही. ती शांतपणे विचार करून त्यावर योग्य उपाययोजना आणि मार्ग काढून त्या समस्येचे निराकरण करते.

६. मार्शमेलो सिद्धांत

जी व्यक्ती इच्छांवर नियंत्रण ठेवू शकते, ती व्यक्ती जीवनात अधिक प्रमाणात यशस्वी होते. एका मनोविकार तज्ञाने विद्यार्थ्यांच्या संदर्भात प्रयोग करून हा सिद्धांत मांडला आहे.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने सुचलेले विचार मी त्यांच्या चरणी समर्पित करतो. ‘सर्व साधकांमध्ये संयम वाढून त्यांना उन्नत आध्यात्मिक जीवनाचा लाभ होवो’, अशी मी गुरुदेवांच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करतो आणि कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

(समाप्त)

– श्री. अशोक लिमकर (वय ७३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.१०.२०२४)