रामनाथी आश्रमात असतांना सौ. निवेदिता जोशी यांना सूक्ष्मरूपाने दुर्गालोकात गेल्याविषयी आलेली अनुभूती !

सनातनच्या रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात असलेली श्री दुर्गादेवीची सिंहारूढ मूर्ती 

 १. ध्यानमंदिरातील श्री दुर्गादेवीला आर्ततेने प्रार्थना करणे 

‘२७.१०.२०२१ या दिवशी सकाळी ९.४५ वाजता मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात नामजपादी उपाय करत होते. ते झाल्यावर माझे लक्ष सिंहारूढ श्री दुर्गादेवीच्या चरणांकडे गेले. एकप्रकारे देवीनेच माझे चित्त तिच्याकडे आकर्षून घेतले. देवीच्या चरणांकडे बघत असतांना ‘ते चरण हळूवारपणे हलत आहेत’, असे मला जाणवले. ‘देवीच्या त्या चरणांमधून संपूर्ण पृथ्वीतलावर चैतन्य मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले. तेव्हा माझा भाव जागृत झाला आणि मी श्री दुर्गादेवीला आत्मनिवेदन केले. मी तिच्या चरणी क्षमायाचना केली. माझ्याकडून झालेल्या चुकांची आर्तभावाने क्षमायाचना केली. त्या वेळी देवीने मला अत्यंत प्रेमाने सांगितले, ‘‘गुरुदेवांनी सांगितलेली प्रत्येक कृती आपण आत्मसात् केली पाहिजे. आता कृतीत आणणार नाही, तर केव्हा आणणार ?’’ मला माझ्या चुकांची खंत वाटून मी देवीच्या चरणी संपूर्णपणे शरण गेले. ‘तूच मला या अवस्थेतून बाहेर काढ. मला गुरुदेवांच्या कृपेसाठी पात्र होता येऊ दे’, अशी मी तिला आर्त भावाने कळवळून प्रार्थना केली.

सौ. निवेदिता योगेंद्र जोशी

२. श्री दुर्गादेवीला प्रार्थना केल्यावर दुर्गालोकात जाणे

त्या वेळी मी श्री दुर्गादेवीला विचारले, ‘‘मी दुर्गालोकात येऊ शकते का ?’’ तेव्हा श्री दुर्गादेवीने मला सांगितले, ‘‘इथे येण्यासाठी माझी इच्छा आणि गुरुदेवांची आज्ञा असावी लागते. तू येऊ शकतेस.’’ त्यानंतर आपोआपच मी सूक्ष्मातून देवीच्या हलणार्‍या चरणांवर माझे मस्तक टेकवले. माझा ‘श्री दुर्गादेव्यै नम: ।’

हा नामजप श्वासाला जोडून होऊ लागला. देवीच्या चरणांवर डोके टेकवल्यावर मी वरवर जात असल्याचे अनुभवत होते. माझ्या मनामध्ये आनंदाचे तरंग उमटत होते.

३. दुर्गालोकाच्या विशाल महाद्वाराजवळील रांगोळीतून क्षात्रतेज आणि धर्मतेज प्रक्षेपित होणे, तसेच भूमीतून कस्तुरीचा सुगंध येणे

दुर्गालोकाच्या विशाल महाद्वाराजवळ मी येऊन थबकले. ‘कुणीतरी मला आता डोळे उघड’, असे सांगितले. मी डोळे उघडले. तेव्हा महाप्रवेशद्वारावर दुर्गातत्त्वाची मोठी रांगोळी घातलेली होती. रांगोळीतून क्षात्रतेज आणि धर्मतेज प्रक्षेपित होत होते, तसेच मातृभावाचीही स्पंदने त्या रांगोळीमध्ये होती. मी आत प्रवेश केल्यावर तेथील भूमीचा स्पर्श अतिशय मुलायम कापसाहूनही मऊ असा होता. तेथील भूमी लाल पिवळ्या केशरी रंगाची होती. भूमीतून कस्तुरीचा सुगंध येत होता.

४. देवीच्या केसांतून प्रक्षेपित होणार्‍या शक्तीमुळे मोठ्या वाईट शक्ती नष्ट होणे

देवी माझ्यासमोर अतिशय विराट रूपात प्रकट झाली. मला ते बघणेही अशक्य होते. मी देवीला प्रार्थना केली, ‘‘हे माते सौम्य रूपातील दर्शन मला घडू दे.’’ त्या वेळी देवीने प्रार्थना ऐकून मला सौम्य रूपात दर्शन दिले. देवीची दृष्टी कृपापूर्ण होती. देवीचे केस अतिशय घनदाट होते आणि ते जणू पृथ्वीपर्यंत रुळत होते. ‘देवीच्या केसांच्या टोकांमधून मोठ्या प्रमाणात शक्तीचे प्रक्षेपण होऊन ती पाताळातील मोठ्या वाईट शक्तींना नष्ट करत आहेत’, असे मला जाणवले. देवीला माळण्यासाठी मोगर्‍यांच्या फुलांची माळ साधिकांनी बनवली होती. देवीच्या सेविकांनी ती माळ देवीच्या केसात माळली.

५. देवीने पृथ्वीवरील वाईट शक्तींचा भार हलका होऊन भूमीवर ईश्वरी राज्य येणार असल्याचे सांगणे

देवी आता सिंहासनावर विराजमान झाली. त्या वेळी तिचे रूप त्रिपुरसुंदरी मातेप्रमाणे भासत होते. त्या वेळी मी देवीला विचारले, ‘‘तूच पृथ्वी देवी आहेस का ?’’ देवी ‘हो’ म्हणाली. ‘आमची कुलस्वामिनी पण तूच आहेस का ?’, असे मी देवीला विचारल्यावर तिने स्मितहास्य केले. ‘हे देवी, तू इतकी क्षमाशील कशी ?’, असे मी विचारले असता देवी म्हणाली, ‘‘मी सर्वांना धारण करते; कारण त्या ठिकाणी श्रीविष्णु आहेत. मी श्रीविष्णूची सेवक आहे. मीच लक्ष्मी रूपाने आहे. सर्वांचे भरण-पोषण करणे, हे माझे कर्तव्य आहे. आता पृथ्वीवरील वाईट शक्तींचा प्रभाव वाढलेला आहे आणि त्याचा मला भार होत आहे. काही कालावधीतच हा भार हलका होणार आहे आणि ईश्वरी राज्य, म्हणजे सात्त्विक राज्याची स्थापना या भूमीवर होणार आहे.

६. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून मी तुमच्या समवेत आहे’, असे देवीने सांगणे

देवी पुढे म्हणाली, ‘तुम्हा साधकांचे दायित्व श्रीविष्णूंनी घेतलेले आहे. तुमच्या माध्यमातूनच पुढे या पृथ्वीवर ईश्वरी राज्य येणार आहे; पण वाईट शक्तींचा त्रासही तुम्हाला सहन करावा लागणार आहे. त्यासाठी आवश्यक ती शक्ती तुम्हाला माझ्याकडून प्राप्त होत आहे. तुम्ही केवळ साधना करा आणि येणार्‍या काळात तुमचे क्रियमाण वापरा. तुम्हा सर्वांवर माझी कृपादृष्टी आहे. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून मी तुमच्या समवेत आहे. देवीचे हे करुणामय बोल ऐकून माझा भाव जागृत झाला. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

७. दैवी बालकांनी झाडांना पाणी घातल्यावर त्यातून कस्तुरीचा सुगंध दरवळणे आणि ध्यानमंदिरातून बाहेर पडल्यावर गुरुदेवांच्या कक्षाकडून मोठ्या प्रमाणात सुगंध येणे 

देवीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून मी थांबत असतांनाच दैवी बालसाधक ध्यानमंदिराच्या बाजूला असलेल्या झाडांना पाणी घालत होते. त्या मातीचा सुगंध वातावरणात दरवळत होता. ‘हाच कस्तुरीचा सुगंध आहे’, याची मनाला जाणीव होऊन आनंद वाटला. मी देवीच्या मूर्तीकडे पाहिले असता ती प्रशांत मुद्रेत स्मित हास्य करत असल्याचे मला वाटले. वाटिकेची जमीनही लाल पिवळी केशरी रंगाची दिसली. ध्यानमंदिरातून बाहेर पडल्यावर गुरुदेवांच्या कक्षाकडून मोठ्या प्रमाणात सुगंध येत होता. त्या पूर्ण मार्गिकेत सुगंध अनुभवत मी माझ्या खोलीत आले.

हे सर्व अनुभवायला दिल्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी आणि श्री दुर्गामातेच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. निवेदिता जोशी (वय ५२ वर्षे, वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), नंदुरबार, जिल्हा नंदुरबार, महाराष्ट्र.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक