संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमकांचे पुनर्वसन लवकरच पूर्ण होणार ! – गणेश नाईक, वनमंत्री

गणेश नाईक

मुंबई, १२ मार्च (वार्ता.) – संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील २५ सहस्रांहून अधिक अतिक्रमकांचे लवकरच संपूर्ण पुनर्वसन करण्यात येईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषद सदस्य राजहंस सिंह यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देतांना ते बोलत होते.

मंत्री गणेश नाईक म्हणाले की, राष्ट्रीय उद्यान होण्यापूर्वी येथे असलेल्या आदिवासी पाड्यांचा हा मूळ प्रश्न आहे. पहिल्या टप्प्यातील ११ सहस्र ३५९ पैकी फक्त २९९ सदनिकांचे वाटप शिल्लक आहे, तर दुसर्‍या टप्प्यातील पुनर्वसनासाठी म्हाडाच्या माध्यमातून सदनिका उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी म्हाडाच्या मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांतील जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या जागा कह्यात आल्यानंतर सदनिका बांधकामाचे काम चालू होईल.

ते म्हणाले की, ज्या पात्र लाभार्थींनी ७ सहस्र रुपये भरलेले आहेत, त्यांना सदनिका देण्याची शासनाची भूमिका आहे. या पुनर्वसन प्रकल्पात अपव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाल्यास याविषयी चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल. आरे कॉलनी येथील १२० एकर जागेवर आदिवासी समाजातील लोकांना प्राधान्याने घरे देण्यात येतील, तर उर्वरित लोकांना उपलब्धतेप्रमाणे सदनिकांचे वाटप केले जाईल.