सांगोला (जिल्हा सोलापूर) – वारकरी संप्रदायात अध्यात्म आणि संस्कार यांचा मोठा ठेवा आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा भगवान शंकरापासून, तसेच नाथ संप्रदायापासून चालू झाली आहे. गाथेचे वाचन सर्वांत प्रथम पांडुरंगाने केले आहे. ‘रामकृष्ण हरि’ हा वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा यापुढेही अखंडपणे चालत रहाणार आहे, असे विचार ‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान, आळंदी’चे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. निरंजननाथ योगीजी महाराज यांनी व्यक्त केले. सांगोला येथील ‘पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतीभवन’ येथे ‘अखिल भाविक वारकरी मंडळा’चे पहिले राज्यस्तरीय वारकरी संमेलन पार पडले. त्या प्रसंगी ते बोलत होते. या संमेलनात अनेक ठराव करण्यात आले.
संत नामदेव महाराज यांचे वंशज ह.भ.प. माधव महाराज नामदास हे संमेलनाचे अध्यक्ष होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून वासकर फडाचे फडप्रमुख ह.भ.प. गोपाळ (अण्णा) वासकर महाराज हे उपस्थित होते. अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज, ह.भ.प. भागवत चवरे महाराज, शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षय भोसले महाराज, पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर भगरे महाराज, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ह.भ.प. शिवाजी वागवेकर महाराज, सांगली जिल्हाध्यक्ष ह.भ.प. लक्ष्मण नवलाई यांसह अखिल भाविक वारकरी मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि मंडळे उपस्थित होती.
संमेलनासाठी अंबिकादेवी मंदिर चौक ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवनापर्यंत ग्रंथदिंडी आणि पालखी काढण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तविक ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी केले.
संमेलनात करण्यात आलेले काही ठराव१. संतविचार शालेय शिक्षणातून दिले पाहिजेत. २. प्रत्येक जिल्ह्यात एक ‘वारकरी भवन’ उभे करावे. ३. भाविक वारकरी मंडळ पदाधिकारी जिथे सप्ताह संयोजक असतील, तिथे कीर्तनामध्ये इतर गीतांना बंदी असावी. ४. महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये मांस आणि मद्य विक्री यांना बंदी असावी. ५. आषाढी वारीप्रमाणे माघ वारीच्या प्रत्येक दिंडीला मानधन चालू करावे. |