गंभीर आजारांविषयी गोव्‍यातील १ लाख लोकांची पडताळणी करणार ! – मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत

टाटा मेमोरियल रुग्‍णालय आणि ऑक्‍सफर्ड विद्यापीठ यांच्‍याशी सामंजस्‍य करार

मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत

पणजी, ११ मार्च (वार्ता.) – कर्करोग, मधुमेह, हृदयरोग आणि मूत्रपिंडाचे आजार यांविषयी गोवा राज्‍यातील १ लाख लोकांची पडताळणी केली जाईल. या रोगांच्‍या संदर्भात व्‍यापक अभ्‍यास करण्‍यासाठी सरकारने टाटा मेमोरियल रुग्‍णालय आणि ऑक्‍सफर्ड विद्यापीठ यांच्‍याशी सामंजस्‍य करार केला असून त्‍यांच्‍या सहयोगाने ही आरोग्‍य पडताळणी केली जाईल, अशी माहिती मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. ११ मार्च या दिवशी गोवा सरकारने टाटा मेमोरियल रुग्‍णालय आणि ऑक्‍सफर्ड विद्यापीठ यांच्‍याशी सामंजस्‍य करार केला. या वेळी मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत, मुख्‍य सचिव व्‍ही. कांदावेलू, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता डॉ. शिवानंद बांदेकर, टाटा मेमोरियल रुग्‍णालयाचे डॉ. राजेश दीक्षित, शरयू म्‍हात्रे, प्रा. सारा, प्रदेश भाजपच्‍या वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर आणि आरोग्‍य खात्‍याच्‍या संचालक डॉ. गीता काकोडकर अन् इतर अधिकारी उपस्‍थित होते.

याविषयी पत्रकार परिषदेत मुख्‍यमंत्री म्‍हणाले, ‘‘या उपक्रमाद्वारे सरकारने गोव्‍यातील नागरिकांचे आरोग्‍य आणि त्‍याविषयीची काळजी यांत सुधारणा करण्‍यासाठी एक सक्रीय पाऊल उचलले आहे. टाटा मेमोरियल रुग्‍णालय आणि ऑक्‍सफर्ड विद्यापीठ यांच्‍या सहयोगाने होणार्‍या आरोग्‍य पडताळणीनंतर ज्‍या शिफारसी सरकारकडे येतील, त्‍या अनुषंगाने पुढील पावले उचलली जातील. सरकारने टाटा मेमोरियल रुग्‍णालय आणि ऑक्‍सफर्ड विद्यापीठ यांच्‍याकडे करार केल्‍याने राज्‍यातील आरोग्‍य क्षेत्राला मोठा लाभ होईल. राज्‍यात चांगल्‍या दर्जाच्‍या आरोग्‍य सेवा उपलब्‍ध करण्‍याच्‍या दृष्‍टीने सरकारचे हे मोठे पाऊल आहे.’’

मुख्‍य सचिव व्‍ही. कांदावेलू म्‍हणाले, ‘‘गोव्‍यात पालटत्‍या जीवनशैलीमुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. आवश्‍यक उपाययोजना करण्‍यासाठी हा व्‍यापक अभ्‍यास सरकारला साहाय्‍य करील. डॉ. शिवानंद बांदेकर म्‍हणाले, ‘‘खाण्‍याच्‍या सवयी आणि पालटती जीवनशैली यांमुळे गोव्‍यात तरुण तरुणींमध्‍येही हृदयरोगाचे आजार दिसून येत आहेत. या अभ्‍यासामुळे महत्त्वाच्‍या गोष्‍टी लक्षात घेऊन उपाययोजना करता येईल.’’