Bjp Mla Ketakee Singh : बलिया (उत्तरप्रदेश) येथे बांधण्यात येणार्‍या रुग्णालयात हिंदु आणि मुसलमान यांच्यासाठी स्वतंत्र इमारत असावी !

भाजपच्या महिला आमदार केतकी सिंह यांची मागणी

आमदार केतकी सिंह

बलिया (उत्तरप्रदेश) – येथे बांधण्यात येत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांमध्ये हिंदूंसाठी अन् मुसलमानांसाठी स्वतंत्र इमारत असावी, जेणेकरून हिंदू मुसलमानांपासून सुरक्षित रहातील, अशी मागणी भाजपच्या महिला आमदार केतकी सिंह यांनी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे. या मागणीवरून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

आमदार केतकी सिंह म्हणाल्या की,

जर मुसलमानांना होळी, रामनवमी आणि दुर्गापूजा यांच्या वेळी समस्या येत असतील, तर त्यांना उपचार घेण्यासही अडचणी येऊ शकतात. मी योगी आदित्यनाथ यांना विनंती करते की, जेव्हा इतके पैसे खर्च केले जात आहेत, तेव्हा तेथे उपचार करता येतीलल यासाठी दोन्ही धर्मियांसाठी वेगळी इमारत किंवा स्वतंत्र शाखा बनवावी. याने हिंदु समाजातील लोकांना सुरक्षित वाटेल.

(म्हणे) ‘केतकी सिंह यांच्या मनात मुसलमानांविषयी द्वेष !’ – मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी

मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी

‘अखिल भारतीय मुस्लिम जमात’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी म्हटले की, आमदार केतकी सिंह यांचे विधान अत्यंत निषेधार्ह आहे. जर रुग्णालय हिंदु आणि मुसलमान यांमध्ये विभागले गेले, तर शाळा, माध्यमिक शिक्षणासाठी महाविद्यालये आणि उच्च शिक्षणासाठी विश्‍वविद्यालये असे वेगवेगळे विभाग करावे लागतील. हा क्रम इतका लांब असेल की, तो हाताळणे अशक्य होईल. असे अनेक मुसलमान आणि ख्रिस्ती देश आहेत, जिथे कोणताही भेदभाव नाही. आपल्या भारतातही भेदभाव पसरवणारी कोणतीही गोष्ट नाही. (भेदभाव नष्ट करण्यासाठी ‘समान नागरिक कायदा’ आवश्यक असतांना मौलाना त्याला विरोध करतात, याविषयी त्यांना काय म्हणायचे आहे ? – संपादक) आमदार असूनही त्यांच्या मनात मुसलमानांविरुद्ध पुष्कळ द्वेष आहे.

संपादकीय भूमिका

मुसलमानांना वर्ष १९४७ मध्ये भारताची फाळणी करून एक मोठा भूभाग इस्लामी देश म्हणून दिल्यानंतरही आज पाकिस्तानपेक्षाही अधिक मुसलमानांची लोकसंख्या भारतात झाली आहे. उद्या ते पुन्हा एकदा नवीन पाकिस्तानची मागणी करू लागणार आहेत, अशीच भीती हिंदूंच्या मनात आहे. अशा वेळी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक झाले असतांना आमदार केतकी सिंह यांनी सांगितल्यानुसार विभागणी करण्यात येऊ नये !