|

दोडामार्ग – तालुक्यात हत्ती पकडा मोहीम राबवण्यासाठी पाठपुरावा चालू आहे. १० मार्च या दिवशी याविषयी मंत्रालयात वनमंत्र्यांसमवेत बैठक आयोजित करून तोडगा काढू. मी शेतकर्यांसमवेत आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी निश्चिंत रहा, असे जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आश्वासन दिल्यानंतर ‘स्वराज्य सरपंच सेवा संघा’चे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी येथे चालू केलेले उपोषण मागे घेतले.
तिलारी खोर्यात हत्ती पकडा मोहीम राबवा, तसेच ही मोहीम राबवल्यानंतर हत्ती पुन्हा येणार नाहीत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करा, या मागणीसाठी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच आणि शेतकरी यांनी दोडामार्ग वन विभागाच्या कार्यालयासमोर ७ मार्चपासून उपोषण चालू केले. ‘जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही’, असा आक्रमक पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेऊन ८ मार्च या दुसर्या दिवशीही उपोषण चालू ठेवले होते. या वेळी उपोषणकर्ते प्रवीण गवस आणि हेवाळे गावचे उपसरपंच समीर देसाई यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आमदार दीपक केसरकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. पालकमंत्री नितेश राणे यांनीही भ्रमणभाषद्वारे गवस यांच्याशी संपर्क साधला. या वेळी गवस यांनी ‘अधिकारी याविषयी चालढकलपणा करत आहेत’, असा आरोप केला. त्या वेळी मंत्री राणे यांनी ‘आम्ही ठोस उपाययोजना काढू आणि त्याचे परिणाम लवकरच दिसतील’, असे सांगितले.
सायंकाळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, सरचिटणीस महेश सारंग, मंदार कल्याणकर आदींनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.