
१. आई आजारी असल्याचा निरोप मिळाल्यावर घरी जाण्यास निघणे; परंतु घरी पोचण्यापूर्वीच आईचे निधन झाल्याचा दूरभाष येणे
‘वर्ष २०१६ मध्ये मी आजारी असतांनाच मला ‘आईला बरे नाही’, असे कळले. ‘तिला रुग्णालयात भरती केले असून सलाईन लावले आहे. तेव्हा तू आजच ये’, असा मला निरोप मिळाला. मला घरी जाण्यास गाडी नव्हती; म्हणून मी ‘दुसर्या दिवशी येते’, असा कुटुंबियांना निरोप दिला. दुसर्या दिवशी माझ्या समवेत एक साधक आले होते. आमची गाडी कुडाळला १ घंट्यात पोचणार होती. त्या अगोदरच मामाने दूरभाष करून सांगितले, ‘‘तुझ्या आईचे निधन झाले.’’
२. आईच्या निधनाची वार्ता ऐकताच हृद्य स्मृतींनी डोळ्यांतून अश्रू येणे आणि आईने फोंडा येथील आश्रमात गुरुमाऊलींच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार केल्याचे दृश्य दिसणे, त्याच वेळी समवेत आलेल्या साधक काकांनी सांत्वन करणे
मी आश्रमात होते; पण ताई (मोठी बहीण) आईसमवेत होती. ‘आई ताई आणि भाऊ यांना आधार होती. त्यामुळेच मी आश्रमात राहून साधना करू शकले. ‘आता मला आधार नाही. सर्व संपले’, असे वाटून माझ्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. मी बसमध्येच काही क्षण डोळे मिटून घेतले. मला डोळ्यांसमोर ‘फोंडा येथील आश्रमात आईने गुरुमाऊलींच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार केला होता’, हे दृश्य दिसू लागले आणि त्याच वेळी माझ्या समवेत आलेल्या काकांनी (साधकांनी) सांत्वन केले.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवलेल्या साधनेमुळे मन स्थिर रहाणे आणि ‘मातृवियोगामुळे भावनाशील होऊन रडण्यात साधनेतील अमूल्य वेळ वाया घालवत आहे’, याची जाणीव होणे
मी डोळे उघडले. मला आतून ‘मी भावनाशील झाले आहे आणि रडण्यामुळे मी माझा साधनेतील अमूल्य वेळ वाया घालवत आहे’, असे जाणवले. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी मला आश्रमजीवन जगायला शिकवले आहे. त्यांनी मला साधना शिकवली आहे. त्यामुळे मला स्थिर रहायला हवे. मी रडलेले त्यांना आवडणार नाही. या प्रसंगी साधना म्हणून मी काय करायला हवे ?’, असे विचार माझ्या मनात येत होते. तेव्हा ‘कुठलाही प्रसंग हा माझ्यासाठी देवच आहे. मला त्यात देवालाच शोधायचे आणि पहायचे आहे’, हे माझ्या लक्षात आले.
४. ‘आईने आम्हा सर्व भावंडांना परात्पर गुरु डॉक्टरांकडे सोपवले आहे’, याची जाणीव होणे आणि परात्पर गुरु डॉक्टरच खरा आधार असल्याचे जाणवून धीर येणे
नंतर माझ्या लक्षात आले की, ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांना आई नमस्कार करत आहे’, हे दृश्य दिसणे आणि त्याच वेळी समवेत असलेल्या काकांनी डोक्यावरून हात फिरवणे, यावरून ‘आईने आम्हाला सर्वांना परात्पर गुरु डॉक्टरांंकडे सोपवले आहे. आता आमचा आधारही तेच आहेत’, असे मला वाटले. आई मायेतील सर्व देऊ शकते. त्यासाठी तिचा आधार असतो; परंतु भगवंत या मायाजाळातून बाहेर काढू शकतो. माझा हात स्वतःच्या हातात धरून आध्यात्मिक जीवन जगायला शिकवणारा आणि धीर देणाराही तोच आहे. ‘भगवंता, आता मला तुझाच आधार आहे.’ त्यानंतर मी एक मास घरी राहून आश्रमात परत आले.
५. साधिकेला पोटदुखीचा तीव्र त्रास होऊन तिच्या डोळ्यांतून पाणी येणे आणि ‘वेदनेकडे दुर्लक्ष होऊ दे, देवाचे स्मरण करण्यातच लक्ष लागू दे ’, अशी तिच्याकडून प्रार्थना होणे
वर्ष २०१६ मध्ये (आश्रमात आल्यानंतर) माझे पोट एवढे दुखायचे की, खाल्लेले सर्व उलटी होऊन पडायचे. मला असह्य वेदना व्हायच्या. ‘मी आता मरणार’, अशी माझी अवस्था असायची. तेव्हा ‘देवा, लढता लढता मी मरून जाणार’, असेच मला वाटते. देवा, मला तुझे नाम घेता घेता मरण आले, तरी चालेल. माझे माझ्या वेदनेकडे दुर्लक्ष होऊ दे आणि तुझ्या चिंतनाकडे, तुझे स्मरण करण्याकडेच माझे लक्ष लागू दे. जे काही व्हायचे, ते तुझ्या इच्छेनेच होऊ दे’, अशी मी देवाला शरण जाऊन प्रार्थना करायचे. त्या वेळी पू. पात्रीकरकाका आणि पू. गाडगीळकाका (आताचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ) माझ्यासाठी नामजपादी उपाय करायचे.
६. तीव्र पोटदुखी होत असतांना परात्पर गुरु डॉक्टरांना पहायला जीव व्याकुळ होणे, अकस्मात् एक संत खोलीत येणे आणि त्यांना प्रत्यक्ष पहाताच माझे डोळे भरून येणे
एक दिवस माझे पोट पुष्कळ दुखू लागले. मला असह्य वेदना होऊ लागल्या. मला देवाच्या आठवणीने रडू येत होते. ‘देवा, तुझ्याविना मी राहू शकत नाही’, असे मी म्हणत असतांना परात्पर गुरु डॉक्टरांना पहायला माझा जीव व्याकुळ झाला होता. दुपारी १ वाजता अकस्मात् एक संत खोलीत आले. त्यांनी मला पाहिले आणि उपाय चालू केले. त्यांना पहाता क्षणी माझे डोळे भरून आले. त्या वेळी वाटले, ‘ज्याप्रमाणे आई बाळाचे रडणे ऐकताच धावतच त्याच्यापाशी जाते, त्याप्रमाणे त्रास होतांना वेदनेकडे दुर्लक्ष करून देवाला आर्ततेने हाक मारली की, ती देवापर्यंत पोचते.’
७. काही वेळ उपाय केल्यानंतर संतांनी आईविषयी विचारणे आणि ‘आपणच तिचा आधार आहोत’, असे त्यांनी अन्य साधकांना सांगणे
माझ्यासाठी १५ ते २० मिनिटे नामजपादी उपाय केल्यानंतर संत माझ्याशी बोलले. त्यांनी मला आईच्या संदर्भात विचारले. नंतर मला ‘‘तू स्थिर आहेस का ?’’, असे विचारले. मी ‘‘हो.’’ म्हणाले. संत म्हणाले, ‘‘तू आईसंदर्भात सांगितलेस, ते पुढे लगेच लिहून द्यायला हवं हं.’’ नंतर ते सहसाधिकेला म्हणाले, ‘‘आईसंदर्भात हिने जे सांगितले, ते लिहून द्यायला कोणीतरी हिला साहाय्य करा.’’ पुढे ते मला उद्देशून म्हणाले, ‘‘आईची साधना छान चालली आहे. काळजी करू नकोस.’’
त्यानंतर ते संत सहसाधिका सौ. श्रावणी आणि तिचे पती श्री. रामानंद परब यांना म्हणाले, ‘‘आता आपणच तिला आधार आहोत.’’ आईने अगोदरच सूक्ष्मरूपाने ‘गुरुमाऊलीच आपला आधार आहे’, असे मला सांगितले आणि आता स्थुलातून संतांनीही तेच सांगितले. तेव्हा मला ‘आधार’ या शब्दाविषयी पुढीलप्रमाणे जाणवले.
८. ‘आधार’ शब्दाचा भावपूर्ण अर्थ
अ. आ – ‘आपले’ म्हणून आपलेसे करणारा. आपल्याला जवळ घेणारा.
आ. धा – (संकटसमयी) धावून येणारा.
इ. र – रणांगणात लढण्यासाठी शक्ती देणारा.
परात्पर गुरु डॉक्टर, ‘‘मी काहीच करत नाही. तुम्हीच लढत आहात’’, असे म्हणून आम्हाला तारणारे तुम्हीच आहात ना ! (हो ना, परात्पर गुरु डॉक्टर, तुम्हीच या लीला करत आहात ना ?)’
– सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|