‘मी शिक्षण पूर्ण झाल्यावर सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली पूर्णवेळ साधना करत आहे. पूर्णवेळ साधना करतांना मला आई-वडिलांचे बहुमोल साहाय्य मिळाले. त्यांनी मला कोणतीही व्यावहारिक अपेक्षा न ठेवता साधना करण्यास प्रोत्साहन दिले. याविषयी मला त्यांची लक्षात आलेली सूत्रे कृतज्ञतापूर्वक लिहीत आहे.

१. पूर्णवेळ साधना करण्याचा निश्चय केल्यावर त्यास पाठिंबा देणे
एप्रिल २०११ मध्ये माझे ‘एम्.बी.ए.’ (MBA (finance))चे शिक्षण पूर्ण झाले. त्या वेळी माझ्या मनात पुढील विचार यायचे, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्याला आपत्काळ जवळ आला असल्याने साधना करण्यासाठी अल्प वेळ राहिला असल्याने साधनेला प्राधान्य द्यायला सांगत आहेत. मी आधीच इतकी वर्षे शिक्षणामध्ये घालवली. ‘आता नोकरीसाठी दिवसातले १२ घंटे गेले, तर मी सेवा आणि साधना कशी करणार?’ त्यामुळे ‘नोकरी न करता केवळ साधनाच करायची’, असे मी ठरवले. आमच्या इमारतीमध्ये रहाणारे एक गृहस्थ शासकीय नोकरीमध्ये उच्च पदावर काम करत होते. ते माझी शेवटच्या वर्षाची परीक्षा होण्यापूर्वी एक दिवस आमच्या घरी आले होते. त्यांनी मला आई-वडिलांसमोर विचारले, ‘‘आमच्या कार्यालयामध्ये एक चांगली नोकरी आहे. वेतनही चांगले आहे. तू ही नोकरी करणार का ?’’ तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगितले, ‘‘मला नोकरी करायची नाही. मला यापुढे केवळ साधनाच करायची आहे.’’ या सर्व प्रक्रियेमध्ये आई-वडिलांनी मला पूर्णवेळ साधना करण्यासाठी कधीच विरोध केला नाही. त्यांनी माझ्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता मला साधनेत साहाय्य केले.
२. श्री. अनिल रामचंद्र पेटकर (कु. क्रांती पेटकर यांचे वडील, वय ६६ वर्षे)

२ अ. आर्थिक स्थिती चांगली नसतांनाही वडिलांनी ‘मुलीने नोकरी करून पैसे मिळवून घरी द्यावेत’, अशी अपेक्षा न करणे : माझे वडील खासगी आस्थापनात कामाला होते. मी पूर्णवेळ साधना करू लागले. तेव्हा त्यांच्या निवृत्तीला एकच वर्ष राहिले होते. त्या आस्थापनामध्ये कित्येक वर्षे वेतनवाढ झाली नव्हती. वेतनही अल्प असल्यामुळे पैशांची बचत होत नव्हती. बाबांना निवृत्तीनंतर निवृत्ती वेतनही (पेन्शनही) मिळणार नव्हते. माझ्या एम्.बी.ए.पर्यंतच्या शिक्षणासाठी लक्षावधी रुपये व्यय झाले होते. अशा परिस्थितीतही वडिलांनी माझ्याकडून कधीही ‘मी नोकरी करून पैसे मिळवावेत आणि घरी द्यावेत’, अशी अपेक्षा केली नाही. आरंभी त्यांना वाटायचे, ‘मी काही दिवस अनुभव घेण्यासाठी नोकरी करावी.’ ते म्हणायचे ‘तुझे सगळे वेतन तू अर्पण कर; परंतु अनुभव घेण्यासाठी काही दिवस नोकरी करून बघ’; पण त्यांनी त्यासाठी कधीच आग्रह केला नाही.
त्यांनी मला सांगितले, ‘‘तुला पूर्णवेळ साधनाच करायची असेल, तर माझा विरोध नाही; पण तुला पुढील आयुष्यात काटकसर करून जगावे लागेल, याची सिद्धता ठेव.’’
२ आ. स्वतः काटकसरीने राहून मुलीला सेवेसाठी आवश्यक ते सर्व आणून देणे : मी २ वर्षे ९ मास देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी राहिले होते. त्यानंतर मी विविध ठिकाणी धर्मप्रसाराची सेवा करत आहे. मी पुण्यात घरी राहूनही नोकरी न करता पूर्णवेळ सेवाच करते, तरीही बाबा कधीही माझ्याकडून ‘मी नोकरी करावी’, अशी अपेक्षा करत नाहीत. याउलट ते स्वतः काटकसरीने रहातात; पण मला मात्र सेवेसाठी जे जे आवश्यक आहे, ते सर्व स्वतःहून आणून देतात.
२ इ. नातेवाइकांचा विरोध सहन करून मुलीच्या पाठीशी ठामपणे उभे रहाणे : मी शिक्षणानंतर पूर्णवेळ आश्रमात रहायला गेल्यानंतर आमचे काही नातेवाईक ‘तुम्हाला मुलीची काळजी नाही का ? तुम्हाला शांत झोप कशी लागते ?’ , असे आई-बाबांना बोलायचे, तरीही आई-बाबा हे सर्व सहन करून ‘मी पूर्णवेळ साधना करावी’, यासाठी माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि ते स्वतःही सेवा अन् साधना करत राहिले.
२ ई. मुलगी सेवेसाठी गेली आहे, तर गुरुदेव तिची काळजी घेतीलच’, अशी ठाम श्रद्धा असणे : मला प्रसारातील काही सेवांच्या निमित्ताने किंवा धर्मशिक्षणवर्ग घेण्यासाठी दूरदूरच्या गावांमध्ये जावे लागते. काही दिवस त्या गावांत रहावे लागते. काही वेळा मला रात्री यायला पुष्कळ विलंबही होतो. तेव्हा ‘मी संध्याकाळी लवकर घरी यावे’, अशीही आई-बाबांची अपेक्षा नसते. त्यांना माझी काळजीही वाटत नाही; कारण ‘मी सेवेसाठी गेले आहे. त्यामुळे परात्पर गुरुदेव माझी काळजी घेतीलच’, अशी त्यांची ठाम श्रद्धा असते.
२ उ. मुलीचा सेवेचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी स्वतःची कामे तिला न सांगता स्वतः सर्व करणे : माझे वडील कपडे धुणे, इस्त्री करणे इत्यादी सर्व कामे स्वतः करतात. त्यांनी आजपर्यंत त्यांचे एकही काम मला करायला सांगितले नाही. मी त्यांना ‘कपड्यांना इस्त्री करून देते’, असे म्हणाले, तरी ते म्हणतात, ‘‘तू तुझी सेवा कर. हे काम मी करतो.’’ माझा सेवेचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी तेच मला अनेक वेळा साहाय्य करतात.
ते बाहेरून दमून आले, तरी ‘मला पाणी आणून दे. माझ्यासाठी चहा कर’, असे मला सांगत नाहीत. स्वतः जाऊन पाणी घेतात. स्वतःसाठी चहा करून घेतात. उलट आम्हालाही ‘चहा हवा आहे का?’, असे विचारतात. बाबा जेवायला बसल्यानंतर त्यांच्या ताटातला एखादा पदार्थ संपला असेल, तर स्वतः उठून वाढून घेतात.
२ ऊ. मुलीला सेवेत साहाय्य करणे : अनेकदा मला सेवेला जाण्याची घाई असते. मला वेळ अल्प असतो आणि अनेक सूत्रे पूर्ण करायची राहिलेली असतात. तेव्हा ते मला माझ्या सेवा पूर्ण करण्यासाठी साहाय्य करतात. अनेकदा माझे आवरून होईर्यंत ते गाडी पुसून आणि तिची शुद्धी करून गाडी मार्गावर आणून लावतात.
३. सौ. सुरेखा अनिल पेटकर (कु. क्रांती पेटकर हिची आई, वय ६२ वर्षे)

३ अ. ‘मुलीने नोकरी किंवा अन्य व्यावहारिक गोष्टींत वेळ वाया न घालवता साधनाच करावी’, असे ठाम मत असणे : आमच्या घरात आई सर्वप्रथम साधनेमध्ये आली. ती सत्संगाला आणि सेवेला जातांना मला समवेत घेऊन जायची. त्यामुळेच मला लहानपणापासून साधनेची गोडी लागली. ‘मी नोकरी किंवा अन्य व्यावहारिक गोष्टी करण्यात वेळ वाया न घालवता साधनाच करावी’, असे तिचे ठाम मत असते.
३ आ. मुलीला मायेतील विचारांपासून परावृत्त करणे : ती मला नेहमी ‘माझे आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी संतांनी मला कसे साहाय्य केले आहे ? देवाने मला कसे जपले आहे ?’, यांविषयी सांगते आणि ‘मी साधनाच करणे आवश्यक आहे’, हे माझ्या लक्षात आणून देते. त्यामुळे माझ्या मनात मायेतील विचार आले, तरी त्यावर आईने सांगितलेली सूत्रे आठवून मात करता येते.
३ इ. आईने वेळोवेळी साधनेचे महत्त्व सांगितल्याने साधनेमध्ये टिकून रहाता येणे : मध्यंतरीच्या कालावधीत माझ्यातील स्वभावदोष वाढल्याने आणि माझी श्रद्धा अल्प पडल्याने माझ्या मनात नकारात्मक विचार आले. त्या वेळी ‘नोकरी करावी’, असा विचार माझ्या मनात सतत असायचा. तेव्हाही आईने मला सांगितले, ‘‘तू नोकरी करायची नाहीस. देवाने तुला साधनेसाठी अनुकूल वातावरण दिले आहे. त्याचा तू लाभ करून घे आणि पूर्णवेळ साधना करण्यालाच प्राधान्य दे.’’ त्यामुळे मी आज मायेतल्या गोष्टींमध्ये वहावत गेले नाही आणि साधनेमध्ये टिकून आहे.
३ ई. आजीचे निधन झाल्यावरही मुलीला घरी न थांबता सेवेला जाण्यास सांगणे : दोन वर्षांपूर्वी माझी आजी (आईची आई – श्रीमती सुलभा विनायक महाजन (वय ८१ वर्षे), मृत्यूसमयीची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) रुग्णालयात अत्यवस्थ होती. त्याच वेळी जिल्ह्यात धर्मप्रेमींची निवासी कार्यशाळा होती. तेव्हा आईने मला ‘तू इथे थांबण्याची आवश्यकता नाही. तुझ्या सेवेकडे लक्ष दे’, असे सांगितले. मी शिबिरात असतांना आजीचे निधन झाले. तेव्हाही मी सेवेत असल्याने तिने मला आजीला अंत्यविधीसाठी नेण्यापूर्वी हे कळवले. त्यानंतर ती मला म्हणाली, ‘‘तू आता इथे थांबण्याची आवश्यकता नाही. अंघोळ करून शिबिराला गेलीस, तरी चालेल.’’ त्यानुसार मी पुन्हा शिबिराला गेले. यातून आईची परात्पर गुरुदेवांवरील श्रद्धा आणि मला साधनेत साहाय्य करण्याची तळमळ शिकायला मिळाली.
३ उ. घरातील कामे स्वतः करून मुलीला सेवा आणि व्यष्टी साधना करण्यास सांगणे : मी घरातील कामांमध्ये साहाय्य करावे’, अशी तिची अपेक्षा नसते. मला तातडीच्या सेवा असतील, तर ‘मी स्वयंपाक करते. तू तुझी सेवा आणि व्यष्टी साधना पूर्ण कर’, असे ती मला सांगते. अनेकदा सांधेदुखीमुळे तिचा उजवा हात दुखतो. संपूर्ण हातावर सूज आलेली असते, तरीही ती घरातील सर्व कामे आणि स्वयंपाक स्वतः करते. मला माझी सेवा आणि व्यष्टी साधना करण्यास प्राधान्य द्यायला सांगते.
३ ऊ. मुलीला नामजपादी उपाय पूर्ण करण्याची आठवण करून देणे : अनेकदा माझा सेवेकडे कल अधिक असतो आणि व्यष्टी साधना पूर्ण करण्याविषयीचे गांभीर्य अल्प पडते. त्यामुळे ती मला प्रतिदिन नामजपादी उपाय पूर्ण करण्याची आठवण करून देते.
प.पू. गुरुमाऊली आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपेने मला साधनेत साहाय्य करणारे आई-वडील मिळाले, त्यांच्यामुळे मी साधना करू शकत आहे आणि साधनेत टिकून आहे. त्याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. क्रांती पेटकर, पुणे (५.२.२०२५)
मागील वर्षभरात साधिकेला स्वतःच्या विचार प्रक्रियेत जाणवलेले पालट
१. कुटुंबीय आणि सहसाधक यांच्याविषयी कृतज्ञता वाटणे : ‘पूर्वी मला परिस्थिती स्वीकारता येत नसे. कुटुंबीय आणि सहसाधक यांच्याकडून मला अपेक्षा असल्यामुळे सर्वांविषयी माझे गार्हाणे असायचे. आता मागील वर्षभरात ‘सर्वजण मला साधनेत साहाय्य करतात’, याची जाणीव होऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटते.
२. आई-वडिलांविषयी कृतज्ञता वाटणे : ‘आई-बाबा माझ्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता मला पूर्णवेळ साधना करण्यास सांगतात’, याची जाणीव होऊन त्यांच्या विषयी मला कृतज्ञता वाटते.
३. ‘सहसाधकांना समजून घेता आले पाहिजे’, याची जाणीव वाढणे : अनेकदा मला विविध सेवांच्या निमित्ताने दूरच्या गावांमध्ये जावे लागते. तेव्हा सहसाधक माझी काळजी घेतात. त्यांच्या वैयक्तिक अडचणी, मर्यादा, कामांची व्यस्तता असूनही ते सेवेत सहभागी होत आहेत. त्यामुळे ‘सहसाधकांना समजून घेता आले पाहिजे’, याची जाणीव आता माझ्यामध्ये वाढली आहे.
४. संतांचा आधार वाटणे : पू. (सौ.) मनीषा पाठक (सनातन संस्थेच्या १२३ व्या (समष्टी) संत, वय ४२ वर्षे) यांनी आजपर्यंत मला नेहमीच वैयक्तिक अडचणी, आध्यात्मिक त्रास, अयोग्य विचार, व्यष्टी आणि समष्टी साधनेतील सूत्रे यांविषयी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी योग्य वेळी तत्त्वनिष्ठ राहून मला माझ्या चुकांची जाणीवही करून दिली आहे आणि आवश्यक तेथे मला आधारही दिला आहे. त्या मला म्हणतात, ‘‘तुझ्या मनात कोणताही विचार आला, तरी एक मोठी बहीण म्हणून तू माझ्याशी मोकळेपणाने बोलू शकतेस.’’ यासाठी गुरुदेव आणि पू. (सौ.) मनीषाताई यांच्या चरणी मी कृतज्ञ आहे.
प.पू. गुरुदेवांनीच हे लिखाण माझ्याकडून करून घेतले, यासाठी श्रीगुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. क्रांती पेटकर, पुणे (५.२.२०२५)