
उत्तरप्रदेशातील संभल येथील पोलीस प्रमुख अनुज चौधरी यांनी काही दिवसांपूर्वी विधान केले होते, ‘जुम्म्याची (शुक्रवारची) नमाज वर्षातून ५२ वेळा असते, होळी वर्षातून एकदाच असते. त्यामुळे ज्यांना होळीचा रंग अंगावर पडल्यामुळे धर्म भ्रष्ट होतो, असे वाटते, त्यांनी एकतर घराबाहेर पडू नये किंवा सहकार्य करावे.’ होळीच्या सणापूर्वी असे मुसलमानांना सांगण्याचे धाडस एका पोलीस अधिकार्याने दाखवणे निश्चितच कौतुकास्पद आहे. संभल क्षेत्र सध्या पुष्कळ संवेदनशील बनले आहे. या ठिकाणी असलेल्या तथाकथित प्रार्थनास्थळाच्या सर्वेक्षणाच्या वेळी झालेल्या हिंसाचाराच्या वेळी काही धर्मांधांचा मृत्यू झाला होता, तसेच दंगलही उसळली होती. तेव्हापासून उत्तरप्रदेशातील बातम्यांच्या केंद्रस्थानी संभल आहे. संभल येथील काही गावांमध्ये मुसलमानांची संख्या वाढली आहे आणि त्यांनी हिंदूंना धमकावल्यामुळे भीतीमुळे हिंदूंनी येथून पलायन केले आहे. संभल येथील दंगलीनंतर काही दिवसांनी पोलिसांनी या भागाचे सर्वेक्षण केल्यानंतर तेथे अनेक गैरप्रकार होत असल्याचे त्यांना आढळले होते. ज्यामध्ये स्थानिक मशिदींमधून अवैध वीजजोडण्या घेऊन धर्मांधांनी आसपासची घरे, मदरसे यांना विजेचा पुरवठा केला होता. वीजमंडळाच्या प्रशासनातील अधिकार्यांचे त्या ठिकाणी जाण्याचे धाडस होत नव्हते; मात्र या वेळी अधिक पोलीस कुमक मागवून या भागाचे सर्वेक्षण करण्यात आले.
हिंदूंचा मोठा सण होळी जवळ येत असल्याने आणि संभलची संवेदनशीलता लक्षात घेता पोलिसांनी आधीच हिंदु अन् मुसलमान या दोन्ही बाजूंकडील महत्त्वाच्या लोकांची एकत्रित बैठक घेतली अन् सहकार्य करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. होळीच्या पार्श्वभूमीवर काही अनुचित प्रकार घडू नयेत; म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दोन्ही बाजूंना विश्वासात घेण्यात आले आहे. त्यानंतर अनुज चौधरी यांनी माध्यमांच्या पुढे मुसलमानांना चेतावणी दिली होती. या चेतावणीच्या नंतर लगेचच मोठा गदारोळ झाला. ‘एक पोलीस अधिकारी असे कसे काय बोलू शकतो ? हा मुसलमानांवर अन्याय आहे, ही मुसलमानांना धमकी आहे’, वगैरे वगैरे ! अनुज चौधरी यांच्या बाजूने अनेकांनी चांगली मतेही व्यक्त केली आहेत. स्वत: अनुज चौधरी यांनी त्यांना सामाजिक माध्यमांवर विधानाविषयी विरोध झाल्यानंतर स्वत: हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर लावतांनाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित करून विरोध करणार्यांना उत्तर दिले आहे. स्वत: कट्टर हिंदु धर्माभिमानी असल्याचे त्यांनी या कृतीतून दाखवून दिले आहे.
योगी आदित्यनाथ यांचे समर्थन !
पोलीस अधिकार्याच्या मोठ्या प्रमाणात प्रसारित झालेल्या विधानामुळे उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला. तेव्हा योगींनी सांगितले, ‘पोलीस अधिकार्यांनी काही चुकीचे विधान केलेले नाही, काळजी घेण्यासाठी सांगितले आहे. केवळ ते ऑलिंपिक आणि अन्य सामन्यांमध्ये पैलवान राहिले आहेत. भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातून थोडी आक्रमकता येणारच, ती समजून घ्यायला हवी !’ एखाद्या पोलीस अधिकार्याने धडक कृती केली अथवा कायदा-सुव्यवस्था न बिघडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काही कठोर भाष्य केले, तर त्याला शासनकर्त्यांनी पाठिंबा दिला, असे सहसा होत नाही. उलट लोकमानसाच्या विरोधात न जाता अधिकार्यावरच कारवाई वा तंबी देण्याची कृती होते. उत्तरप्रदेशात मात्र योग्य काम करणार्या पोलिसाला राज्याच्या नेतृत्वाकडून पाठिंबा मिळत आहे. राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जर प्रामाणिक अधिकार्याच्या पाठीशी उभे राहिले, तर त्यालाही काम करण्यासाठी हुरूप येतोच, अन्य अधिकार्यांनाही काम करण्यासाठी प्रेरणा मिळते.
प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री आणि अन्य मंत्री ‘राज्यातील कायदा-सुव्यवस्था नीट राहिली पाहिजे, दंगे होता कामा नयेत’, याविषयी भाष्य करतो; मात्र प्रत्यक्षात पोलीस आणि अन्य प्रशासकीय अधिकारी यांना निर्णय घेण्याचे अथवा काम करण्याचे स्वातंत्र्य नसते. उलट एखाद्या समाजाच्या भावना दुखावू नयेत म्हणून नियमबाह्य कृती करण्यासाठी अधिकार्यांना प्रवृत्त केले जाते. परिणामी अधिकार्यांचे मनोधैर्य खालावत असे. काँग्रेसच्या राज्यात ‘अधिकार्यांना नियम आणि धर्मांधांना सवलत’, असे समीकरणच होते. महाराष्ट्रात भिवंडीमध्ये धर्मांधांनी २ पोलिसांना हालहाल करत मारले, तरीही धर्मांधांवर कारवाई होत नाही. आझाद मैदानात झालेल्या दंगलीच्या वेळी धर्मांधांनी महिला पोलिसांचे कपडे फाडले, विनयभंग केला, तरी त्या धर्मांधांवर काहीच कारवाई नाही. अशामुळे धर्मांध अधिकाधिक उद्दाम होत जातात आणि पोलीस गलितगात्र ! काही पोलीस अधिकारीच धर्मांधांशी हातमिळवणी करतात, त्यांची हांजी हांजी करतात, त्यांनी सांगितल्याप्रमाणे कारवाईही करतात. पोलिसांनी धर्मांधांना नियंत्रित करण्याऐवजी धर्मांधच संख्याबळाने आणि दहशतीने पोलिसांना नियंत्रित करतात. उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाच्या कार्यकाळात वेगळे काही नव्हते, तेथेही बिहारप्रमाणे जंगल आणि माफिया राजच होते. उत्तरप्रदेशात प्रत्येक भागात ‘बाहुबली’ गुंडांचे राज्य, त्यांची समांतर यंत्रणा कार्यरत होती. पोलीस हिंदूंवरच अन्याय करायचे आणि धर्मांधांपुढे नांगी टाकायचे. त्यामुळे समाजवादी पक्षाच्या कार्यकाळात हिंदू दहशतीत अन् दंगलींचे प्रमाण अधिक होते. हिंदूंवरच खटले प्रविष्ट व्हायचे, हे वेगळेच. हिंदूंच्या प्रत्येक मिरवणुकीवर दगडफेक व्हायची, मंडपांवर आक्रमणे व्हायची, मंदिरांवर आक्रमणे व्हायची. गोवंशियांच्या हत्या व्हायच्या, हिंदु मुली-महिला यांची अब्रू लुटली जायची. पोलीस शासनकर्त्यांच्या ताटाखालचे मांजर बनून नियमबाह्य कारवाई करत होते. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांना सत्तेत आल्यावर प्रथम अकार्यक्षम, कामात चुका करणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी लागली. अनेक गुंडांना चकमकीत ठार केले. चांगल्या पोलीस अधिकार्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळेच आज उत्तरप्रदेशात योगींचा दरारा निर्माण झाला आहे. आझमगढसारखे भाग ज्यांचे नाव घेतले, तरी लोक कापायचे, तेथे योगींनी काही दिवसांपूर्वी ‘एम्स’च्या रुग्णालयाची पायाभरणी केली. आताही संभलमध्ये तेथील मंदिरे, पवित्र विहिरी शोधण्याचे काम चालू आहे. ५४ तीर्थक्षेत्रे आणि १९ विहिरींचा शोध लागला आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेली मंदिरे उघडण्यात येत आहेत. संभलमधील हिंदूंचे जे आहे, ते हिंदूंना मिळालेच पाहिजे, अशी योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. संभल येथील स्थितीवरून आणि तेथे ज्या धडकपणे अन् वेगाने कारवाई चालू आहे, त्यावरून लक्षात येते की, शासनकर्त्यांसह पोलीस-प्रशासकीय यंत्रणेत अधिकारी हे राष्ट्र-धर्मप्रेमी असल्यावर पालट होण्यास वेळ लागणार नाही.
हिंदू आणि हिंदु सणांच्या सुरक्षेसाठी संभलमधील पोलीस प्रमुखांप्रमाणे धर्मांधांना कठोर संदेश देणारे अधिकारी सर्वत्र हवेत ! |