Banswara Church Converted To Mandir : बांसवाडा (राजस्थान) येथे हिंदु कुटुंबे पुन्हा हिंदु धर्मात आल्यावर चर्चचे झाले मंदिरात रूपांतर !

चर्चचे झाले मंदिरात रूपांतर

बांसवाडा (राजस्थान) – बांसवाडा जिल्हा मुख्यालयापासून अनुमाने ६० कि.मी. अंतरावर असलेल्या सोडलादुधा गावात एका चर्चचे मंदिरात रूपांतर करण्यात आले आहे. ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या ३० हून अधिक लोकांनी घरी परतून हिंदु धर्म स्वीकारला आहे. चर्चमधून मंदिरात रूपांतरित झालेल्या ठिकाणी भगवान भैरवाची मूर्ती पूर्ण विधी आणि धार्मिक विधींसह स्थापित केली जाणार आहे.

१. बांसवाडाच्या गंगारदाताली पंचायत समितीच्या सोडलदुद्दा गावात रहाणार्‍या अनुमाने  ४५ कुटुंबांनी अनेक वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. आजूबाजूच्या परिसरातील अनेक कुटुंबांनीही ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील आदिवासी लोकांच्या उन्नतीसाठी रा.स्व. संघ आणि विश्व हिंदु परिषद यांच्या सहकार्याने काम करणार्‍या ‘भारतमाता मंदिर प्रकल्पा’ने या कुटुंबांना पुन्हा हिंदु धर्मात आणण्यासाठी प्रयत्न केले. हे प्रयत्न यशस्वी झाले आणि ३० कुटुंबांनी हिंदु धर्म स्वीकारला. त्यानंतर येथे बांधलेल्या चर्चचे मंदिरात रूपांतर करण्यात आले.

२. आतापर्यंत चर्चचे पाद्री असलेले गौतम हिंदु धर्मात परतले होते आणि त्यांनी चर्चचे मंदिरात रूपांतर करण्याचे काम चालू केले होते. हे काम आता पूर्ण झाले आहे. गरसिया या आदिवासी कुळातील गौतम म्हणाले की, त्यांनी ३० वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. यानंतर या धर्माशी संबंधित अधिकारी गावात येऊ लागले. प्रार्थना आणि सभा चालू झाल्या. जेव्हा त्यांची २ मुले, सुना आणि कुटुंबातील इतर सदस्यही ख्रिस्ती धर्मात धर्मांतरित झाली, तेव्हा त्यांना चर्चचे पाद्री बनवण्यात आले; पण ‘भारतमाता प्रकल्पां’तर्गत गावातील बहुतेक कुटुंबे स्वधर्मात परतली आहेत.

३. गौतम यांनी पुढे सांगितले की, ते पुजारी बनल्यानंतर त्यांनी ३ वर्षांपूर्वी स्वतःच्या भूमीवर एक चर्च बांधले होते. चर्च बांधल्यानंतर इतर पाद्रीही चर्चच्या मेळाव्याला येऊ लागले. ते प्रत्येक रविवारी चर्चमध्ये प्रार्थना सभाही घेत होते. त्यांच्या धर्मांतरानंतर इतर ४५ गावकर्‍यांनीही त्याचा धर्म स्वीकारला. गौतम हिंदु धर्मात परतल्यानंतर त्याच्या कुटुंबासह ३० कुटुंबांनीही हिंदु धर्म स्वीकारला आहे. चर्चचे मंदिरात रूपांतर झाल्यानंतर त्यावर आता धार्मिक ध्वज फडकत आहे. ख्रिस्ती धर्माशी संबंधित चिन्हे काढून टाकण्यात आली आहेत.