UP Priest Beaten By Muslims : रामपूर (उत्तरप्रदेश) येथील शिवमंदिरावरील भोंग्याच्या आवाजावरून मुसलमानांकडून पुजार्‍याला मारहाण

१२ मुसलमानांना अटक

रामपूर (उत्तरप्रदेश) – येथील सिकंदराबाद गावात ७ मार्चच्या रात्री शिवमंदिरात भोंग्यावरून भजन लावल्याचा आरोप करत मुसलमानांनी मंदिरांच्या पुजार्‍याला मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी १२ मुसलमानांना अटक केली. त्यांना न्यायालयाने जामीनावर मुक्त केले. सध्या गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

१. शिवमंदिराचे पुजारी प्रेम सिंह यांनी लेखी तक्रारीत म्हटले आहे की, मंदिरात भोंग्यावरून भजन लावल्यानंतर गावातील रहिवासी भूरी, तौफिक, इक्बाल, छिद्दा, इस्रायल, शैदा, शकील, मुन्सा अली, गुलनाझ, अनीस इत्यादी मंदिर परिसरात घुसले आणि त्यांनी भोंग्यावरून भजन लावण्यास विरोध करत शिवीगाळ केली. जेव्हा मी त्यांना विरोध केला, तेव्हा त्यांनी मला मंदिरातून बाहेर काढून मारहाण केली, तसेच पुन्हा भोंग्यांवरून भजन लावल्यास ठार मारण्याची धमकी दिली.

२. पोलीस निरीक्षक ओंकार सिंह म्हणाले की, मंदिराच्या शेजारी रहाणार्‍या एका महिलेने पुजार्‍याला भोंग्याचा आवाज अल्प करण्यास सांगितले होते, जेणेकरून रमझानची अजान  ऐकू येईल. याविषयावरून पुजार्‍याचा गावातील काही लोकांशी वाद झाला; परंतु मारामारीची कोणतीही घटना घडली नाही.

संपादकीय भूमिका

  • मंदिरावरील भोंग्याचा आवाज मर्यादित आवाजापेक्षा अधिक होता, असे जर मुसलमानानांना वाटत होते, तर त्यांनी पोलिसांत तक्रार का केली नाही ?  अशी तक्रार आली असती, तर पोलिसांनी चौकशी केली असती; मात्र तसे न करता मुसलमानांकडून मारहाण करण्याचा प्रकार म्हणजे जाणीवपूर्वक हिंदूंवर आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे, हे स्पष्ट होते !
  • जर या ठिकाणी हिंदूंनी मशिदीवरील भोंग्याच्या आवाजावरून असेच कृत्य केले असते, तर काय झाले असते ?, याचा विचार केला पाहिजे !