आज कुकशेत गाव (नेरूळ) येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान !

नवी मुंबई – नवी मुंबई भाजप पुरस्कृत जय गजानन मित्र मंडळ आणि महिला बचत गट यांच्या वतीने कुकशेत गाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या वेळी विविध शासकीय योजनांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माजी नगरसेवक सूरज पाटील यांनी दिली. प्रमुख पाहुणे म्हणून वनमंत्री गणेश नाईक उपस्थित असणार आहेत. ९ मार्च या दिवशी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत कुकशेत गावातील महापालिका शाळेत हा कार्यक्रम होईल.

या वेळी महिलांसाठी आरोग्य शिबिरात विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नेत्र तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, कान, नाक घसा तज्ञ, विनामूल्य ईसीजी/आयजीएम् चाचणी करण्यात येणार आहे. मूकबधिर आणि कर्णबधीर व्यक्तींसाठी विशेष रोजगार मेळावा राबवण्यात येईल. शासकीय योजना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये नवीन बचत गट बनवणे व बचत गटांकरीता केंद्रशासन/ राज्यशासन/ महानगरपालिकेच्या विविध योजनांची माहिती, घरकाम करणार्‍या महिलांसाठी विविध योजना मार्गदर्शन, सुकन्या समृद्धी योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, आयुष्यमान कार्ड, स्त्री मुक्ती संघटना कौटुंबिक सल्ला व समुपदेशन, नशामुक्त व मधुमेह मुक्त भारत अभियान, सेल्फ डिफेन्स, दोन वर्षांच्या आतील विधवा महिलांना पेन्शन आणि त्यांच्या मुलांकरीता वयाच्या १८ वर्षापर्यंत १ सहस्र ५०० दरमहा रक्कम मिळण्याविषयी मार्गदर्शन, एस्.सी. आणि एस्.टी. जात प्रमाणपत्र असणार्‍या नागरिकांना एस.बी.आय. बँकेडून १० ते २५ लाख रुपये विना गॅरंटी अटी, शर्ती विना कर्ज सुविधा देणे, नवीन मतदार नोंदणी करण्यात येणार आहे.