
सातारा, ८ मार्च (वार्ता.) – जिल्ह्यातील, तसेच महाराष्ट्रातील विविध प्रश्नांविषयी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक दृष्टीकोनातून जागेवरच संबंधित विभागांना लेखी सूचना दिल्या आहेत.
यामध्ये ‘शिवस्वराज्य सर्किट’ विकसित करणे, वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ तालुका करणे, कराड येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालय, तसेच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या न्यायालयांच्या नवीन इमारतींसाठी जागा उपलब्ध करून देणे, मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत असणारे सातारा लोहमार्ग दूरक्षेत्राचे लोहमार्ग पोलीस ठाण्यात रूपांतर करणे, राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागास नवीन बसगाड्या उपलब्ध करून देणे, कास पाणीपुरवठा योजनेवर आधारित १ किलोवॅट क्षमतेचा लहान जलविद्युत् प्रकल्प उभारण्यास मान्यता देणे, क्षेत्र माहुली येथे नवीन कारागृह उभारण्यास्तव जागा हस्तांतरित करणे, जिहे-कटापूर योजनेस निधी उपलब्ध करून देणे, सातारा शहरातील गुरांचे चिकित्सालय असलेली जागा नगर परिषदेकडे हस्तांतरित करणे, इ.एस्.आय.सी. रुग्णालय आणि कामगार भवन निर्माण करण्यासाठी सातारा एम्.आय.डी.सी. मधील भूखंड हस्तांतरित करणे, ‘होलार समाज आर्थिक विकास महामंडळा’साठी निधी उपलब्ध करून देणे आदी कामांचा समावेश आहे. या सर्व कामांचे अवलोकन करून सर्व कामे तातडीने मार्गी लावावीत, अशा लेखी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.