‘एकदा मी गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) स्मरण करत असतांना आणि माझ्या मनाचा आढावा घेत असतांना माझ्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले अन् माझी भावजागृती झाली. ‘गुरुदेव माझ्यासाठी पुष्कळ करतात आणि मी त्यांच्यासाठी काय करते ?’, याचे आत्मपरीक्षण करतांना मी पुढील प्रश्न माझ्या मनाला विचारले.

१. गुरुदेवांनी मला घडवले आहे; पण मी त्यांना अपेक्षित असे घडत आहे का ?
२. गुरुदेवांनी मला सर्वकाही दिले; पण मी माझे सर्वकाही त्यांना दिले का ? मला केवळ त्यांच्या अखंड स्मरणात रहाणे तरी जमेल का ?
३. गुरुदेव मला केवळ आनंदच देत आहेत; मात्र मी प्रयत्न करून त्यांना आनंद देते का ?
४. गुरुदेवांनी मला माझ्यातील स्वभावदोषांसहित स्वीकारले आहे; मात्र माझ्या जीवनात घडलेले लहान-मोठे प्रसंग मी माझे प्रारब्ध आणि त्यांची इच्छा म्हणून स्वीकारते का ?
५. गुरुदेवांमुळे मी कणमात्र साधना करू शकते; पण माझ्याकडून ‘कृतीशील’ साधना कणमात्र होते का ?
६. गुरुदेवांनी मला विविध सेवा शिकवल्या; मात्र त्या सेवा करतांना मी संपूर्णतः स्वतःला विसरते का ?
७. गुरुदेव साक्षात् सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप आहेत. त्या स्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न मी कधी केला का ?
८. गुरुदेव मला प्रत्येक क्षणी अनुभूती देत आहेत; मात्र मी त्याकडे ‘अनुभूती’ या भावाने पहाते का ?
९. गुरुदेवांना वाटते, ‘माझ्या साधकांसाठी काय करू अन् काय नको !’ मलाही गुरुदेवांविषयी असे वाटते का ?
१०. गुरुदेवांच्या कृपेने माझा श्वास चालू आहे; मात्र त्या श्वासाची भावसुमने कधी होणार ?
११. गुरुदेवांविना माझे कुणीही नाही. माझ्या आतापर्यंत झालेल्या सहस्रो जन्मांत तेच माझे आई-वडील आणि सर्वस्व आहेत. ‘तेच मला त्यांच्यामध्ये एकरूप करून घेणार आहेत’, हे तर ब्रह्मांडातील सत्यवचन आहे !
१२. मी त्यांना माझ्या डोळ्यांतील अश्रू अर्पण करून त्यांना अपेक्षित अशी व्यष्टी साधना करू शकते का ?
‘हे प्रश्न मी माझ्या मनाला विचारले आणि माझे मन काय म्हणाले ?’, याचे चिंतन केले. त्या वेळी ‘माझे मन म्हणजेच गुरुदेवच आहेत; कारण ‘माझे स्वतःचे’ असे काहीच नाही’, हे माझ्या लक्षात आले.’
– कु. अपाला अमित औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), फोंडा, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |