‘गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल’ अंतर्गत ‘गो गोवा गोशाळा’ कार्यक्रम
कुंडई – साक्षात् भगवान श्रीकृष्णाने गोपालक बनून गोमातेची सेवा केली. जशी आपण भगवंताची पूजा करतो, तशी गायीची पूजा आपल्या धर्माने सांगितलेली आहे. गोमाता सर्वांना पूजनीय आणि वंदनीय आहे. सद्गुरु ब्रह्मेशानंदस्वामी यांचा संकल्प आहे की, गोमातेची हत्या या गोभूमीवर होता कामा नये; कारण जोपर्यंत गोमाता सुरक्षित आहे, तोपर्यंत सनातन धर्म सुरक्षित आहे. सद्गुरु ब्रह्मेशानंदस्वामी यांनी सनातन धर्माविषयी सर्वत्र जागरूकता निर्माण केलेली आहे, असे संबोधन हरिद्वार येथील पू. भूपेंद्रगिरी स्वामी यांनी केले.
पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदस्वामी यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली श्री दत्त पद्मनाभ पीठ तथा ‘सत्गुरु फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित ‘गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल २०२५’ अंतर्गत ‘गो गोवा गोशाळा’ हा कार्यक्रम श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठाच्या गोशाळेत पार पडला. याप्रसंगी पू. भूपेंद्रगिरी स्वामी संबोधन करत होते.
‘एक मंदिर, एक गोशाळा’, हा संकल्प करा ! – सद्गुरु ब्रह्मेशानंदस्वामी
गोव्यात ज्याप्रमाणे गायींचे पालन, पोषण, संरक्षण होत आहे, ते वाढवण्याची आज आवश्यकता आहे. गोमातेच्या संरक्षणार्थ गोमंतकियांनो, ‘एक मंदिर, एक गोशाळा’, हा संकल्प करा. गाय सर्वांचे रक्षण करते. राजा दिलीपने पुत्रप्राप्तीसाठी गोमातेची सेवा केली, तिला वाचवण्यासाठी स्वत:चा प्राण द्यायला सिद्ध झाले. एवढी श्रेष्ठता, एवढे महत्व आपल्या भारत देशातील संस्कृतीने गायीला दिलेले आहे. गोमाता, भूमाता, जननी जन्मभूमी या सर्वांशी नाती सांभाळून ठेवली पाहिजेत, असे उद्बोधन श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदस्वामी यांनी केले.
‘गो गोवा गोशाळा’ या कार्यक्रमात गोव्यातील विविध गोशाळांचे प्रतिनिधी या एकाच व्यासपिठावर आमंत्रित करण्यात आले होते. गोसंवर्धन आणि गोपालन या हेतूने तपोभूमी गोशाळेत ‘गोदान’ या मोहिमेच्या माध्यमातून गोदान केलेल्या दात्यांना पूज्य संतांच्या शुभ हस्ते आशीर्वाद स्वरूप गौरव करण्यात आला. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.