तिस्क उसगांव येथील बालिकेचा पाण्यात बुडून गुदमरल्याने मृत्यू
फोंडा (गोवा), ७ मार्च (वार्ता.) – कसलये, तिस्क उसगाव येथील ५ वर्षीय बालिकेची हत्या काळ्या जादूमुळे नव्हे, तर मुलीची आई आणि आरोपी पूजा यांच्यातील भांडणापोटी झाली, अशी माहिती दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकम सिंह यांनी दिली आहे. ते म्हणाले, ‘‘आमच्या न्यायवैद्यक पडताळणी पथकाने घटनास्थळी पडताळणी केल्यानंतर काळ्या जादूचे कोणतेही अवशेष मिळाले नाहीत.’’ अमेरा ज्युडास अन्वारी या ५ वर्षांच्या बालिकेचा पाण्यात बुडून गुदमरून मृत्यू झाला, असे तिच्या मृतदेहाच्या शवचिकित्सेमध्ये स्पष्ट झाले आहे. ७ मार्च या दिवशी दुपारी तिचा मृतदेह घरी आणण्यात आला. त्यानंतर सायंकाळी फोंडा येथील दफनभूमीमध्ये शोकाकूल वातावरणात तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या बालिकेची हत्या केल्याच्या प्रकरणी कसलये येथील पप्पू आणि त्याची पत्नी पूजा यांना फोंडा पोलिसांनी कह्यात घेतले असून अन्वेषण चालू आहे.
अमेराच्या आईने पप्पू आणि त्याच्या पत्नीने तिच्या मुलीला पाण्यात बुडवून ठार केले, असे म्हटले आहे आणि हे क्रूर कृत्य केल्याविषयी त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. सीसीटीव्हीमुळे हा हत्येचा प्रकार उघडकीस आला. २ दिवसांपासून अमेरा बेपत्ता होती. अमेरा पप्पू याच्या घरी जातांना दिसली; परंतु परत येतांना दिसली नाही. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी या दांपत्याची चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा मान्य केला.
उसगाव येथील घटना अत्यंत दुर्दैवी ! – विश्वजीत राणे
उसगाव येथील घटना अत्यंत दुर्दैवी असून या संदर्भात मी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये कडक शिक्षा झाली पाहिजे. पोलीस दलाकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा मला विश्वास आहे.
संपादकीय भूमिकापोलिसांचा अहवाल येण्यापूर्वीच ऐकीव माहितीवरून अंधश्रद्धेमुळे बालिकेची हत्या केल्याचे वृत्त देणे, हीच मोठी अंधश्रद्धा नाही का ? |