औरंगजेबाच्या कबरीला केले जाणारे साहाय्य थांबवून छत्रपती शिवरायांच्या मंदिराला भरघोस साहाय्य करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

औरंगजेबाच्या कबरीसाठी लाखो रुपये, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला केवळ २५० रुपये !

हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट

मुंबई – औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्व खात्याकडून प्रतीवर्षी लाखो रुपयांचे साहाय्य घेतले जात आहे. उपलब्ध माहितीनुसार वर्ष २०२१-२२ मध्ये तब्बल २ लाख ५५ सहस्र १६० रुपये, तर वर्ष २०२२-२३ (नोव्हेंबरपर्यंत) २ लाख ६२६ रुपये खर्च करण्यात आले. अशा प्रकारे आतापर्यंत ६ लाख ५० सहस्र रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे; मात्र  दुसरीकडे महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक असलेल्या मालवण येथील सिंधुदुर्ग गडावर स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी केवळ २५० रुपये इतकाच तुटपुंजा निधी राज्य सरकारकडून दिला जातो. हे संतापजनक असून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदु धर्म आणि महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांच्या मंदिराला शासनाकडून योग्य निधी दिला जात नाही. उलट औरंगजेबासारख्या क्रूर आक्रमकाच्या कबरीच्या देखभालीसाठी मोठा निधी दिला जात आहे. ज्याने छत्रपती संभाजी महाराजांवर अमानुष अत्याचार केले, अशा औरंगजेबासाठी हा खर्च करणे योग्य आहे का ? हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी मागणी केली की, हे साहाय्य तातडीने थांबवावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी भरघोस आर्थिक साहाय्य घोषित करावे. सरकारने त्वरित यात लक्ष घालून महाराष्ट्राच्या अस्मितेचा विचार करावा.

संपादकीय भूमिका

अशी मागणी करण्याची वेळ राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटनेवर का येते ? सरकारने स्वतःहून ही कृती करणे अपेक्षित आहे !