Jalandhar Babbar Terrorists Arrested : जालंधर (पंजाब) येथे ३ आतंकवाद्यांना अटक !

हत्येचा मोठा कट उधळला !

पंजाब पोलिसांची कारवाई !

जालंधर (पंजाब) : ‘जालंधर काऊंटर इंटेलिजेंस युनिट’ने ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ (बीकेआय) या आतंकवादी संघटनेशी संबंधित ३ आतंकवाद्यांना अटक केली. ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’च्या सूचनेनुसार आरोपी पंजाबमध्ये एकाची हत्या करणार होते. हत्येचा हा कट ‘जालंधर काऊंटर इंटेलिजेंस युनिट’ने उधळून लावला. पोलिसांनी आरोपींकडून अवैध शस्त्रे, ४ आधुनिक पिस्तूल आणि १५ हून अधिक जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. लवकरच पोलीस आरोपींना न्यायालयात उपस्थित करतील, अशी माहिती पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी दिली.

गौरव यादव पुढे म्हणाले की,

अटक केलेल्या आरोपींची ओळख जगरूप सिंह उपाख्य जग्गा, सुखजीत सिंह उपाख्य सुखा आणि नवप्रीत सिंह उपाख्य नव अशी आहे. प्राथमिक अन्वेषणात असे दिसून आले की, हा आतंकवादी गट अमेरिकेतील गुंड गुरप्रीत सिंह उपाख्य गोपी नवशहरिया हा चालवत होता. गुरप्रीत सिंह हा पाकिस्तानस्थित आतंकवादी हरविंदर सिंह रिंडा याचा जवळचा सहकारी आहे. या प्रकरणी अमृतसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कटाचे संपूर्ण जाळे उघड करण्यासाठी पुढील अन्वेषण चालू आहे.