राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भैय्याजी जोशी यांच्या मराठीविषयीच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडली भूमिका !

मुंबई, ६ मार्च (वार्ता.) – आम्ही अन्य भाषेचाही सन्मान करतो. जो स्वत:च्या भाषेवर प्रेम करू शकतो, तोच अन्यांच्या भाषेवर प्रेम करू शकतो. महाराष्ट्रात रहाणार्यांनी मराठी शिकले पाहिजे. महाराष्ट्रात रहाणार्यांना मराठी आले पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भैय्याजी जोशी यांचेही याविषयी दुमत असेल, असे नाही, अशी राज्यशासनाची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडली.
श्री. भैय्याजी जोशी यांनी घाटकोपर येथील एका कार्यक्रमात ‘महाराष्ट्रातील प्रत्येकाला मराठी बोलता आलीच पाहिजे, असे नाही’, असे वक्तव्य केल्याचा संदर्भ ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी दिला. श्री. भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य मराठीचा अवमान करणारे आहे, असे सांगत याविषयी ‘मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण द्यावे’, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली.