संपादकीय : खलिस्तानची कीड नष्ट करा !

डॉ. जयशंकर यांच्या वाहनासमोर भारताचा राष्ट्रध्वज फाडताना खलिस्तानी

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर सध्या ब्रिटनच्या दौर्‍यावर आहेत. तेथे एका कार्यक्रमातून बाहेर पडल्यावर ते त्यांच्या वाहनाच्या दिशेने निघाले. तेथे खलिस्तानी समर्थक आधीपासूनच उपस्थित होते. डॉ. जयशंकर यांना पाहून त्यांनी घोषणा देण्यास प्रारंभ केला. एका खलिस्तानी समर्थकाने त्यांच्या वाहनाच्या पुढे येत त्यांचा मार्ग अडवला. या वेळी त्याने भारताचा तिरंगाही फाडण्याचे कृत्य केले. सुरक्षारक्षकांनी त्याला हटकले. खलिस्तान समर्थकांनी परराष्ट्रमंत्र्यांसह भारतीय अधिकार्‍यांना धमक्या देण्याचा प्रयत्न केला. खलिस्तानवाद ही भारतासाठी कायमचीच डोकेदुखी झालेली आहे. ‘त्यापासून भारताची सुटका कधी होणार ?’, हा प्रत्येकालाच पडलेला प्रश्न आहे. भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या संदर्भात ब्रिटनमध्ये निर्माण झालेली स्थिती अतिशय चिंताजनक आणि गंभीर आहे.

‘डॉ. जयशंकर यांच्यासाठी तेथे मोठा धोकाच निर्माण झाला होता’, असे म्हणता येईल. ‘जर खलिस्तानवाद्यांनी परराष्ट्रमंत्र्यांवर आक्रमण केले असते, तर किती मोठा अनर्थ ओढावला असता’, याचा विचारच करू शकत नाही.

ब्रिटनने वेळीच शहाणे व्हावे !

ब्रिटनमध्ये जे झाले, त्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण प्रकाराच्या वेळी पोलीसही तेथे उपस्थित होते. त्यांच्या समक्ष असा प्रकार करण्याचे खलिस्तानवाद्यांचे धाडस होतेच कसे ? खलिस्तानी उपस्थित असल्याचे लक्षात येऊनही पोलिसांनी आधीच त्यांना रोखले का नाही ? या प्रकरणी पोलिसांचीही चौकशी व्हायला हवी. ब्रिटन सरकारच्या सुरक्षाव्यवस्थेत इतकी मोठी घोडचूक होतेच कशी ? पोलिसांनी संबंधित खलिस्तानवाद्याला पकडल्याचे समजते; पण त्यानंतर त्याच्यावर कोणती कारवाई झाली, हेही भारताला कळायला हवे. कालांतराने त्याला मोकळे सोडले आणि पुन्हा त्याने भारतविरोधी प्रकार केला, तर त्याला उत्तरदायी कोण ? या प्रश्नांच्या उत्तरांच्या प्रतीक्षेत भारत आहे. जे पोलीस गुन्हेगारीचे उच्चाटन करण्यात सर्वश्रेष्ठ मानले जातात, त्या पोलिसांकडून खलिस्तानवाद्यांना मोकळीक कशी मिळते ? कि ते खलिस्तानवाद्यांचे समर्थन करत आहेत ? हा प्रश्नच आहे. भारतविरोधी तत्त्वांना समर्थन देणे हे भारताला कदापि आवडणार नाही, हे तेथील सरकारने लक्षात घ्यायला हवे. यात अजून एक महत्त्वाची गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे जो देश ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकत आगेकूच करत आहे आणि ज्या देशाने जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था म्हणून मान प्राप्त केला आहे, त्याच देशाच्या एका मंत्र्याच्या संदर्भात स्वत:च्या देशात असा प्रकार घडतो, हे ब्रिटनसाठी लज्जास्पद नव्हे का ? भारताने ब्रिटनला वेळीच चेतावणी द्यायला हवी की, भारतीय मंत्र्यांच्या संदर्भात असे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत. हे जर असेच चालू राहिले, तर भारतही माघार घेणार नाही. परिणामी ब्रिटनला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते; मात्र हे त्याला परवडणारे नाही.

आधी ‘सर्वांत मोठा तेल आयातदार देश’ म्हणून भारताची ओळख होती. भारताने प्रगतीपथावर येऊन ती ओळख पुसून टाकली आणि ‘युरोपला सर्वाधिक शुद्ध तेल पुरवणारा देश’ अशी नवी ओळख प्राप्त केली. भारत स्वतःची आवश्यकता पूर्ण करून संपूर्ण युरोपची तेलाची तहान भागवत आहे. याकडे ब्रिटनने दुर्लक्ष करून चालणार नाही. त्या देशाच्या आर्थिक नाड्या आज भारताकडे आहेत. जर ब्रिटनने खलिस्तानवाद्यांना वेळीच रोखले नाही, तर भारत तेलाची निर्यात वेळप्रसंगी रोखूही शकतो. प्रतिवर्षी ब्रिटनला भेट देणार्‍या भारतातील पर्यटकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. वर्ष २०२३ च्या आकडेवारीनुसार ब्रिटनला ६ लाख भारतीय पर्यटकांनी भेट दिली होती. जर भारतीय पर्यटकांना तेथील पर्यटनास बंदी घातली, तर ब्रिटनवर किती मोठी नामुष्की ओढावेल ? आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या ब्रिटनला नामशेषच व्हावे लागेल. संभाव्य परिस्थितीची जाण ठेवून त्याने भारत आणि भारतीय मंत्री यांच्यासमवेत योग्य वर्तन ठेवावे अन् त्यांचा मानही राखावा. भारतासमवेत विश्वासघात करणे ब्रिटनला महागात पडू शकते, हे त्याने लक्षात ठेवावे !

कॅनडाच्या पावलावर पाऊल टाकू नये !

१२ ऑगस्ट २०१८ या दिवशी तेथील ट्रफाल्गर स्क्वेअर येथे खलिस्तानवादी एकत्र येऊन मोर्चा काढणार होते. तेव्हा भारताने मोर्चा रहित करण्याची मागणी केली होती; पण तत्कालीन सरकारने तसे करण्यास नकार दिला. ‘हा मोर्चा म्हणजे भारताच्या प्रादेशिक एकात्मतेला धोका देण्यासाठी केलेले कृत्य होय’, अशा शब्दांत भारताने तेव्हा खेद व्यक्त केला होता. ७ वर्षांनंतरही ब्रिटन खलिस्तानप्रेमी मानसिकता बाळगून वावरत आहे. खलिस्तानवादाला वेळीच आवर घालत त्याचे समूळ उच्चाटन न केल्यास खलिस्तानवादी ब्रिटनला त्यांचे पाणी दाखवण्यास मागे-पुढे पहाणार नाहीत. ब्रिटनने स्वतःच्या पोटापाण्याचा विचार करावा. स्वतःचा देश वाचवायचे सोडून खलिस्तानवादाला आमंत्रण देणे महागात पडू शकते. खलिस्तानवादाला आश्रय देणार्‍या कॅनडाची आज काय दुर्दशा झाली, ते आपण जाणतोच ! तशी वेळ स्वतःवर येऊ नये, असे ब्रिटनला वाटत असेल, तर ही खलिस्तानची कीड वेळीच नष्ट करायला हवी. आजचा भारत हा पूर्वीसारखा राहिलेला नाही. ‘अरे’ला ‘कारे’ करण्याइतके सामर्थ्य त्याच्याकडे आहे. भारत दिवसेंदिवस आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि युद्धसज्ज होत असल्याने तो सर्वांना पुरून उरणारच आहे, हे लक्षात ठेवून भारतासमवेत अदबीने वर्तणूक करावी !

खलिस्तान्यांनी तिरंगा फाडणे, तसेच परराष्ट्रमंत्र्यांचे वाहन अडवणे असे कृत्य केल्याप्रकरणी सर्वच भारतियांनी या खलिस्तान्यांच्या विरोधात उभे रहायला हवे. ब्रिटन सरकारकडे त्यांच्यावर कारवाईची मागणी करायला हवी. तसे झाल्यासच खलिस्तानवाद्यांवर वचक बसेल ! दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भारतातच तिरंग्याच्या अनेक ठिकाणी केल्या जाणार्‍या अवमानाशी भारतियांना कसलेही देणेघेणे नसते. त्यामुळे ते तिरंग्याच्या लंडनमधील अवमानाविरोधात कधी आवाज उठवणार ? हा प्रश्नच आहे. त्यापुढे जाऊन खलिस्तान्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणे भारतियांसाठी दूरचीच गोष्ट म्हणावी लागेल; पण भारताच्या विरोधातील वाढत्या घटना पहाता भारतियांनी आतातरी जागृत व्हावे आणि धडक कारवाई होण्यासाठी ब्रिटन सरकारकडे पाठपुरावा करायला हवा.

खलिस्तानवादाचे समर्थन करणे न थांबवल्यास भारत ब्रिटनच्या आर्थिक नाड्या आवळण्यास मागे-पुढे पहाणार नाही, हे लक्षात घ्यावे !