एका आकडेवारीनुसार देशात वर्ष २००० पासून आजपर्यंत २ सहस्र ५०० हून अधिक सैनिक नक्षली कारवायांना बळी पडले आहेत. ही संख्या याच कालावधीत प्रत्यक्ष युद्धात बळी गेलेल्या जवानांच्या तुलनेत कितीतरी अधिक आहे. ५० पेक्षा अधिक वर्षांपासून आपला देश या नक्षली समस्येने ग्रस्त आहे; परंतु चीनशी मैत्री करणार्या काँग्रेसच्या राज्यात या समस्येकडे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने पाहिले न गेल्याने; किंबहुना कुठेतरी त्याला पोसण्याचाच भाग झाल्याने नक्षलवाद फोफावला. त्यामुळे ३ वर्षांपूर्वी शहरी नक्षलवाद्यांना अटक झाल्यावर काँग्रेस नेत्यांनी टाहो फोडला होता. प्रतीवर्षी सहस्रो कोटी रुपये खर्चूनही नक्षलग्रस्त भाग समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कित्येक वर्षे मागेच राहिला.
महाराष्ट्रातील गडचिरोली भागातील नक्षलवाद संपुष्टात येत आहे, अशा आशयाचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले. महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्रात सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असतांना त्यांनी तेथील नक्षलवाद संपवण्यासाठी जिवावर उदार होऊन पुष्कळ काम केले. त्याचे परिणाम आताही दिसत आहेत. काँग्रेसच्या काळात एखाद्या पोलिसाने भ्रष्टाचार करण्यास नकार दिला, तर त्याचे स्थानांतर गडचिरोलीत होत असे. ही स्थिती आता नसावी. ज्या साम्यवादी विचारांनी देश पोखरला आहे, त्याचाच शारीरिक स्तरावरील भाग म्हणजे नक्षलवाद आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी देश नक्षलमुक्त करण्याचे विधान केले होते. त्या अनुषंगाने पावले पडत असल्याचे लक्षात येत आहे. गेली कित्येक वर्षे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून लांब असलेल्या आदिवासी बांधवांची दिशाभूल करून आणि त्यांना आमिषे दाखवून नक्षलवादी बनवले गेले. काही वेळा त्यांना पर्यायच नाही, अशी त्यांची अवस्था झाली; कारण ते नक्षलवादी बनले नसते, तर कदाचित वेगळ्या पद्धतीने ते मारले गेले असते. अलीकडेच केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सी.आर्.पी.एफ्.ने) छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यातील दुलेड, मुकरजकोंडा, टेकलगुडेम आणि पूवर्ती या ४ गावांत गुरुकुल स्थापन करून नक्षलप्रभावी क्षेत्रांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम चालू केले. तेथील नागरिक त्यांच्या मुलांना स्वतःहून शाळेत आणत आहेत, ही अतिशय सकारात्मक गोष्ट घडू लागली आहे. शासनाने याआधीही एकात्मिक कृती योजना, राष्ट्रीय साक्षरता मिशन, सर्वांसाठी शिक्षण, सर्व शिक्षा अभियान, ‘ई-लर्निंग’, डिजिटल शिक्षण इत्यादी उपक्रमांच्या माध्यमातून नक्षलग्रस्त भागात शिक्षण पोचवण्याचे प्रयत्न केले आहेत; परंतु त्यांना नक्षलवादी होण्यास रोखण्यापासून केवळ विकास नव्हे, तर त्यांच्यातील धर्म आणि राष्ट्र यांच्याविषयीचा अभिमानही जागृत असणे तितकेच महत्त्वाचे आहे अन् तो धर्माचरणानेच निर्माण होऊ शकतो.
– श्री. किशोर जगताप, पुणे