प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

प्रश्न : किं नु हित्वा अर्थवान् भवति ?
अर्थ : कशाचा त्याग करणे, हे माणसाच्या हिताचे आहे ?
उत्तर : कामं हित्वा अर्थवान् भवति ।
कामनांचा त्याग करणे, हे माणसाच्या हिताचे आहे.
‘काम’ शब्द ढोबळ अर्थाने मानला जातो, त्याप्रमाणे केवळ लैंगिकतेपुरता मर्यादित नाही. कोणतीही कामना, वासना ही काम शब्दाच्या व्यापक अर्थामध्ये समाविष्ट होते.
पंचज्ञानेंद्रियांना सुखावह वाटणार्या शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध इत्यादींविषयीची अभिलाषा म्हणजे काम. कामाचे वास्तविक स्वरूप आवश्यकतेपेक्षा अधिकाच्या कामनेतून व्यक्त होते आणि असा हा काम कधी तृप्त होत नाही.
न जातु कामः कामानाम् उपभोगेन शाम्यति ।
हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते ।।
– श्रीमद्भागवत, स्कन्ध ९, अध्याय १९, श्लोक १४
अर्थ : सुखांचा उपभोग घेतल्याने विषयवासनेची तृप्ती होत नाही, तर हवनद्रव्याने जसा अग्नी, त्याप्रमाणे उपभोगाने विषयवासना अधिकाधिक वाढत जाते.
अशी ही कामप्रवृत्ती माणसाच्या शारीरिक, मानसिक, कौटुंबिक अन् सामाजिक हिताचा नाश करत असते. कामाचे रूपांतर व्यसनात होते, तसे झाले, तर संपत्तीचाही नाश होतो.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ग्रंथ ‘यक्षप्रश्न’)